---Advertisement---

बार्सिलोना क्लबचे माजी अध्यक्ष बार्तोमेओ यांना अटक, बार्सागेट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

On: सोमवार, मार्च 1, 2021 10:12 PM
---Advertisement---

– नचिकेत धारणकर 

मागील काही दिवसांत मेस्सीने दिलेली मुलाखत आणि तो क्लब सोडणार या बातम्यांना थोडी विश्रांती मिळाली असतानाच बार्सिलोना क्लब आज पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळेस मात्र चर्चेचे कारण मेस्सी नसून क्लबचे माजी अध्यक्ष बार्तोमेओ आहेत. मागील वर्षी समोर आलेले बार्सागेट प्रकरण आज पुन्हा एकदा चर्चेत आले जेव्हा बार्सिलोना संघाच्या कार्यालयात पोलीसांनी धडक दिली.

काय आहे बार्सागेट प्रकरण?
फेब्रुवारी २०२० ला असे निदर्शनास आले की त्यावेळेचे बार्सिलोना क्लबचे अध्यक्ष बार्तोमेओ यांनी उरुग्वेच्या एका खाजगी कंपनीला बार्सिलोना संघातील काही वरिष्ठ खेळाडू तसेच काही माजी खेळाडूंची सोशल मीडियावर बदनामी करण्याचे काम सोपवले. आय३ नाव असलेल्या या कंपनीने सोशल मीडियावर काही फेक अकाउंट तयार करून संघाचे कर्णधार मेस्सी, पिके तसेच माजी खेळाडू पुयोल, झ्यावी आणि बार्सिलोना क्लबच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार विक्टर फाँट यांची सोशल मीडियावर बदनामी केली.
याच प्रकरणात बार्सिलोनाचे माजी प्रशिक्षक आणि सध्याचे मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांची सुद्धा बदनामी करण्याचा कट रचला होता.

२०२० च्याच सप्टेंबर महिन्यात एल मुंडो या स्पॅनिश वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार बार्तोमेओने आय३ या कंपनीला सोशल मीडिया वरील प्रचारासाठी नियमित रकमेच्या ६ पट अधिक रक्कम देत स्वतःचा वैयक्तिक फायदा करून घेतला. तसेच या कंपनीला पैसे सुद्धा अश्या प्रकारे दिले गेले की त्यासाठी बाँडची गरज पडणार नाही आणि अश्या प्रकारे बार्सिलोना बोर्डच्या इतर सदस्यांपासून हे प्रकरण लपवता येईल.

याच प्रकरणाच्या चौकशी साठी आज पोलीसांनी बार्सिलोनाच्या कार्यालयावर धडक मारली आणि या प्रकरणाच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर आज माजी अध्यक्ष बार्तोमेओ, क्लबचे सीईओ ऑस्कर ग्र्यू आणि कायदेशीर सल्लागार रोमन यांना दोषी ठरवत अटक केली.

याआधी सुद्धा मेस्सी आणि बार्तोमेओ यांच्यातील मतभेदामुळे बार्तोमेओ चर्चेत होते. मेस्सीने सप्टेंबर महिन्यात दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा क्लब आणि बार्तोमेओ विरुद्ध आपले मत मांडले आणि त्यानंतरच बार्तोमेओ आणि इतर सदस्यांनी आपला राजीनामा दिला.
त्याआधी संघाची चॅम्पियन्स लीगमधील सुमार कामगिरी, खेळाडूंना दिलेली रक्कम, मेस्सीला क्लब सोडायची परवानगी न देण्यापासून ते माजी खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांच्यावर नेहमीच टीका होत होती. या घटनेचा क्लबच्या आगामी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नक्कीच परिणाम होईल. बार्तोमेओ यांच्या अटकेनंतर तरी मेस्सी बार्सिलोनामध्येच थांबेल अशी आशा सर्व समर्थक करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---