Cheteshwar Pujara :- बीसीसीआयने बुधवारी (14 ऑगस्ट) दुलीप ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या फेरीसाठी संघांची घोषणा केली. शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे या स्पर्धेतील संघांची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. मात्र, या चार संघात भारताचा अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याला जागा मिळाली नाही. त्यानंतर आता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
दुलीप ट्रॉफीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह काही वरिष्ठ खेळाडू खेळताना दिसतील, अशा चर्चा होत्या. मात्र, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांची नावे संघात दिसली नाहीत. यासोबतच मागील काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना देखील दुसरी संधी देण्यात आली नाही. याच मुद्द्यावर बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने आपली प्रतिक्रिया दिली.
अली म्हणाला, “गौतम गंभीर प्रशिक्षक असतानाही पुजाराला संधी मिळाली नाही हे पाहून आश्चर्य वाटले. त्याला दुलिप ट्रॉफी खेळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयार ठेवण्याची संधी होती. ही गोष्ट खरंच आश्चर्यकारक आहे.” अली याने या सोबतच रहाणे, रिंकू सिंग व संजू सॅमसन यांना देखील संधी न मिळाल्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. भारत शिवम दुबेच्या रूपाने एक अष्टपैलू तयार करत असल्याचे निरीक्षण त्याने नोंदवले.
पुजारा हा सध्या भारताच्या कसोटी संघाचा भाग नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर त्याला संघातून बाहेर केले गेले आहे. पुजारा याने मागील दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासाठी सर्वश्रेष्ठ कामगिरी केली होती. मागील दोनही दौऱ्यावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची करामत करून दाखवली आहे.
हेही वाचा-
बांग्लादेशकडून महिला टी20 विश्वचषकाचे यजमानपद हिसकावले जाणार, या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता
“भारत भाग्यवान आहे…” माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने केंद्रीय करार नाकारलेल्या खेळाडूंबद्दल दिली परखडं प्रतिक्रियापाकिस्तानच्या दिग्गजानं सांगितले जगातील दोन आवडते खेळाडू, दोन्हीही भारतीयचं!