MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा थरार सुरू होण्यासाठी आता दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पुन्हा एकदा तमाम क्रिकेटप्रेमींना चौकार-षटकारांची उधळण पाहायला मिळेल. तुफान यशस्वी झालेल्या या पहिल्या हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या (कमीत कमी 100 धावा) टॉप तीन खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया.
एमपीएलच्या पहिल्या हंगामात ईगल नाशिक टायटन्स संघाचा युवा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) हा केवळ तीन सामने खेळू शकला होता. परंतु, या तीनही सामन्यात त्याने बॅटने अक्षरशः आग ओकली होती. त्याच्या बॅटमधून एक शतक व एक अर्धशतक आलेले. त्याने तीन सामन्यात 195 धावा करताना 195 चाच स्ट्राईक रेट राखला होता. विशेष म्हणजे तो या हंगामात सर्वाधिक 19 षटकार मारणारा खेळाडू ठरलेला.
एमपीएल 2023 मध्ये ‘फिनीशर’ आणि ‘सिक्स हीटिंग मशीन’ अशा नावाने ओळखला गेलेला ईगल नाशिक टायटन्सचाच धनराज शिंदे (Dhanraj Shinde) अनेकांच्या नजरेत आला होता. डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी त्याने करून दाखवली. त्याने पहिल्या हंगामात सहा सामने खेळताना 162 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने आपला स्ट्राइक रेट 192.86 इतका जबरदस्त राखला. पहिल्या हंगामात त्याने 13 षटकार खेचलेले.
पुणेरी बाप्पा संघाचे नेतृत्व करणारा भारतीय संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने देखील पहिल्या हंगामात आपल्या स्फोटक फलंदाजीचे दर्शन घडवले होते. पुणे संघाला टॉप थ्री पर्यंत नेण्यात त्याने सर्वात मोलाची भूमिका बजावलेली. ऋतुराजने 188.76 असा जबरदस्त स्ट्राइक रेट खेळलेल्या चार सामन्यात राखला.
या प्रमुख तीन फलंदाजांव्यतिरिक्त रत्नागिरी जेट्सचे फलंदाज प्रितम पाटील व निखिल नाईक यांनी अनुक्रमे 175 व 166 अशा मोठ्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या. तर, पुणेरी बाप्पा संघाचा सुरज शिंदे व ईगल नाशिक टायटन्सचा मंदार भंडारी हे देखील 150 पेक्षा जास्तचा स्ट्राइक रेट राखण्यात यशस्वी ठरलेले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धेची तयारी सुरू आहे. यंदा देखील सर्व प्रेक्षकांना संपूर्ण स्पर्धेसाठी गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विनामूल्य प्रवेश दिला जाईल. ही स्पर्धा JioHotstar व Star Sports 2 येथे थेट प्रक्षेपित केली जाईल. यासोबतच प्रथमच WMPL ही चार महिला संघांदरम्यान पार पडेल. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)





