भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी२० सामन्यांची मालिका गुरुवारी (२९ जुलै) संपली. श्रीलंकेने ही मालिका २-१ ने जिंकली. भारताच्या युवा संघाकडून या मालिकेत भरपूर अपेक्षा होत्या. कारण, या मालिकेतील कामगिरीच्या आधारावर खेळाडूंना टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान निश्चित करण्याची संधी होती. स्वतः कर्णधार शिखर धवनला सलामीवीर म्हणून या मालिकेत चांगली कामगिरी करत टी२० विश्वचषकासाठी दावेदारी ठोकता आली असती. मात्र, तो यामध्ये अपयशी ठरला.
धवनची संथ फलंदाजी
कर्णधार म्हणून वनडे आणि टी२० मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या धवनला टी२० मालिकेत फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या सामन्यात ३६ चेंडूत ४६ धावा, तर दुसऱ्या सामन्यात ४२ चेंडूत ४० धावा केल्या. मात्र, अखेरच्या सामन्यात तो खातेही खोलू शकला नाही. त्यामुळे चाहत्यांनी त्याला संथ फलंदाजीमुळे निशाण्यावर धरले. ही मालिका गमावल्याने भारत श्रीलंकेकडून १३ वर्षानंतर द्विपक्षीय टी२० मालिकेत पराभूत झाला. (battle between shikhar and rahul for t20 wc opener spot)
टी२० विश्वचषकासाठी राहुलची दावेदारी
शिखर या मालिकेत अपयशी ठरल्याने केएल राहुलसाठी टी२० विश्वचषकाचे दरवाजे खुले होऊ शकतात. आकडेवारीचा विचार केल्यास राहुल हा शिखरपेक्षा वरचढ ठरतो. राहुलने आतापर्यंत भारतीय संघाचे ४९ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना ३९.९२ च्या सरासरीने १५५७ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट १४२.१९ असा दर्जेदार राहिला आहे. त्याच्या नावे टी२० क्रिकेटमध्ये २ शतके व १४ अर्धशतके आहेत.
दुसरीकडे, शिखरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ६७ सामन्यात तो १७५९ धावा काढण्यात यशस्वी झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट केवळ १२६ असून, त्याने ११ अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये दोघे उत्तम फॉर्ममध्ये असले, तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर राहुल वरचढ ठरतो.
हे खेळाडूही आहेत दावेदार
टी२० विश्वचषकासाठी उपकर्णधार रोहित शर्मा संघाचा पहिल्या पसंतीचा सलामीवीर असेल. दुसरा सलामीवीर म्हणून शिखर व राहुलसह इशान किशन आणि पृथ्वी शॉ हे देखील दावेदार मानले जातायत. त्यांनी आयपीएलसह आपल्या छोट्याशा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सर्व क्रिकेट चाहत्यांना व समीक्षकांना कौतुक करण्यास भाग पाडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियनच्या ताफ्यात नव्या भारतीय सदस्याची एंट्री, नावावर आहेत ५००पेक्षा जास्त विकेट्स
‘हे’ ३ भारतीय फलंदाज आहेत ‘लंबी रेस का घोडा’! मोडू शकतात सचिनचा मोठा विश्वविक्रम
असे ४ प्रसंग, जेव्हा कसोटी सामन्यात एकाच दिवशी बनल्या होत्या ५०० हून जास्त धावा