पुणे । भारतीय क्रिकेट बोर्डाने पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय पुरुष संघाबरोबर महिला संघासाठीही मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केवळ भारतीय पुरुष क्रिकेट संघ या दौऱ्यात जाणार होता.
या दौऱ्यात भारतीय महिला संघ टी२० मालिका खेळणार असून भारतीय पुरुष संघाचा सामना ज्या मैदानावर आहे त्याच मैदानावर आदल्या दिवशी हे सामने होणार आहे. सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाणार आहे.
भारतीय संघातील अनुभवी खेळाडू मिथाली राज आणि झुलन गोस्वामी यांनी वेळोवेळी परदेश दौऱ्याची इच्छा व्यक्त केली होती तसेच तेथील संघाना भारतात आमंत्रित करावे असेही म्हटले होते.
यासाठी दक्षिण आफ्रिका बोर्डाने पुढाकार घेतला होता आणि त्याला बीसीसीआयने मंजुरी दिली आहे. देशांतर्गत क्रिकेटपेक्षा महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी जास्त उत्सुक होत्या आणि त्यांची ही इच्छा पूर्ण होत आहे.