आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थातच आयसीसीने कसोटी क्रिकेटकडे क्रिकेटरसिकांना आकर्षित करण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली होती. २०१९-२१ या कालावधील झालेल्या या स्पर्धेत उत्तम खेळ करत अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. यानंतर उपविजेता भारतीय संघ आगामी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. नुकतेच बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेद्वारे भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ ला प्रारंभ करणार आहे. यादरम्यान भारतीय संघाला ६ बलाढ्य संघांसोबत कसोटी मालिका खेळायची आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. (Bcci announced scheduled of indian team for world test championship)
इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाला मायदेशात नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये भारतीय संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. हा दौरा झाल्यानंतर भारतीय संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंका संघासोबत दोन हात करणार आहे. त्यानंतर त्यांना बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
तर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून करेल. भारतीय संघाला बांगलादेश संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव
भारत आणि न्यूझीलंड या संघांतील कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचा राखीव दिवशी निकाल लागला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला अवघ्या १७० धावा करता आल्या होत्या. न्यूझीलंड संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्यासाठी अवघ्या १३९ धावांची गरज होती. हे लक्ष्य कर्णधार केन विलियमसन आणि अनुभवी रॉस टेलरने ९६ धावांची भागीदारी करत पूर्ण केले. या मोठ्या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची ३८ वर्षे
अखेर जंटलमन्स जिंकले! असा खेळला गेला पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना
विराट कोहलीच्या ‘या’ कल्पनेला केन विलियम्सनने केला विरोध, म्हणाला…