भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असेलल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेनंतर उभय संघात ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवार (१९ मार्च) रोजी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात ३ नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
भारताचा टी२० स्पेशलिस्ट कृणाल पंड्या याला वनडे संघात स्थान मिळाले आहे. साल २०१८ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर जवळपास ३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळणार आहे. कृणालबरोबर ३० वर्षीय फलंदाज सूर्यकुमार यादव आणि २५ वर्षीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचीही निवड करण्यात आली आहे.
विराट कोहलीच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत. तर रोहित शर्मा याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
ही वनडे मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील तीनही सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे पार पडणार आहेत. हे सामने अनुक्रमे २३, २६ आणि २८ मार्च रोजी होतील. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होतील.
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, Shubman Gill, Shreyas, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), KL Rahul (wk), Y Chahal, Kuldeep Yadav, Krunal Pandya, W Sundar, T Natarajan, Bhuvneshwar Kumar, Md. Siraj, Prasidh Krishna, Shardul Thakur.
— BCCI (@BCCI) March 19, 2021
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.