भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बंगाल क्रिकेट संघाला मोठा धक्का दिला आहे. बंगालचा संघ नामिबियात होणाऱ्या ग्लोबल टी२० स्पर्धेत खेळणार असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु बीसीसीआयने या स्पर्धेतील बंगाल संघाच्या सहभागाबाबत मोठा खो दिला आहे. बीसीसीआयने बंगालच्या संघाला या स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिलेली नाही. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे बंगालच्या संघाने या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआय आपल्या कोणत्याही पुरुष खेळाडूला परदेशातील टी२० स्पर्धांमध्ये खेळू देत नाही. बंगाल संघालाही परवानगी न देण्यामागे हेच कारण असल्याचे मानले जात आहे.
इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांनी त्यांच्या क्रिकेटपटूंना जगभरातील टी२० लीगमध्ये खेळण्यास मान्यता दिली आहे. परंतु भारतीय क्रिकेटपटूंना हे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू विना निवृत्ती इतर कोणत्याही देशाच्या लीगमध्ये खेळू शकत नाहीत.
नामिबियात होणाऱ्या या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर बंगालचा संघ नामिबिया, पाकिस्तान सुपर लीगमधील संघ लाहोर कलंदर्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या एका देशांतर्गत संघाशी खेळणार होता. ही स्पर्धा १ ते ९ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार होती. आता बंगालने या स्पर्धेतून माघार घेतल्याने स्पर्धेचा अवधी कमी होणार आहे. त्याचवेळी बंगालने या स्पर्धेसाठी आपला संघ घोषित केला होता. या संघात आयपीएल गाजवलेले आकाशदीप, मुकेश कुमार, इशान पोरेल, शाहबाज अहमद, हृतिक चॅटर्जी यांची निवड झाली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून नामिबिया आगामी टी२० विश्वचषकासाठी तयारी करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! बुमराहच्या ‘पाठी’ पुन्हा दुखापतीचा वेताळ! आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी साधली सुवर्ण हॅट्ट्रीक! सात्विक-चिराग जोडीने जिंकले गोल्ड