नवी दिल्ली । भारतीय संघात परतण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असणाऱ्या युसूफ पठाणच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. गेल्यावर्षी डोप टेस्टमध्ये नापास झालेल्या युसूफ पठाणला बडोदा संघात स्थान देण्यात येऊ नये असे बीसीसीआयने बडोदा क्रिकेट संघटनेला कळवले आहे.
युसूफ पठाण गेल्या मोसमात बडोद्याकडून केवळ एक रणजी सामना खेळला असून त्यानंतर कोणत्याही स्पर्धेत त्याला बडोद्याकडून भाग घेता आलेला नाही.
काय आहे प्रकरण?
युसूफ पठाणने ब्रोजिट नावाच्या औषधाचे सेवन केले आहे. ह्या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. याचे जर एखाद्या खेळाडूला सेवन करायचे असेल तर त्याआधी त्याला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. परंतु युसूफ पठाण किंवा बडोदा क्रिकेटच्या कोणत्याही डॉक्टरने अशी परवानगी घेतली नव्हती. त्याचमुळे हा खेळाडू डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे.
परिणाम?
याच कारणामुळे बीसीसीआयने युसूफच्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यावर बंदी घातली आहे. युसूफ पठाणने आजपर्यंत ज्या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे त्या सईद मुस्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याला आता भाग घेता येणार नाही. ही स्पर्धा सध्या राजकोट येथे सुरु आहे. शिवाय या स्पर्धेत चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात परतण्याचे स्वप्न यामुळे धुळीस मिळाले आहे.
यापूर्वी कोणत्या खेळाडूवर झाली अशी कामगिरी ?
युसूफ पठाण हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे ज्यावर डोप टेस्टमूळे बीसीसीआय कारवाई करणार आहे. यापूर्वी प्रदीप सांगवान ह्या खेळाडूवर १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. २०१२ आयपीएलवेळी सांगवान डोप टेस्टमध्ये दोषी आढळला होता.