भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानादेखील आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. ही स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आहे. अशातच कडक बायो बबल असूनसुद्धा खेळाडूंना कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता देशभरातून आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परंतु बीसीसीआय आयपीएल स्पर्धा रद्द करणार नसून सामने दुसऱ्या शहरात स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात आहे.
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील सामने मुंबई आणि चेन्नईमध्ये खेळवले गेले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येत आहेत. सोमवारी (३ मे) कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडू, चेन्नई सुपर किंग्ज संघातील ३ सदस्य आणि अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे दिल्लीच्या उच्च न्यायालयात दिल्लीतील सामने थांबवावेत अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.
अशातच बीसीसीआय आयपीएल स्पर्धेतील पुढील सामने मुंबईमध्ये खेळवण्याचा विचार करत आहे. ७ मेपासून आगामी सामने मुंबईत हलवण्यात येणार असल्याचे समजत आहे. याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केली गेली नाहीये.
मुंबईत आयपीएल स्पर्धा खेळवण्यामागचे कारण
बीसीसीआयने जर हा निर्णय घेतला तर, त्यामागे काही कारणं असू शकतात. मुंबईमध्ये तीन क्रिकेट स्टेडियम आहेत. हे सर्वात मोठे कारण असू शकते. मुंबईत वानखेडे स्टेडियम, ब्रेबोन स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम आहेत. त्यामुळे इथे व्यवस्थितरित्या आयपीएल २०२१ च्या पुढील सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.
वेळापत्रकात होऊ शकतो बदल
जर आयपीएल २०२१ चा हंगाम मुंबईत स्थलांतरित करण्यात आला, तर वेळापत्रकात काही बदल होऊ शकतो. ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना ३० मेला अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. तो पुढे ढकलून जूनच्या पहिल्या आठवड्यात खेळवला जाऊ शकतो. अहमदाबादच्याच मैदानावर प्लेऑफचे सामने होणार आहेत. याद्वारे बीसीसीआय प्रवास करण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात आहे.
कसा असेल संघाचा प्रवास
आयपीएलचा दुसरा टप्पा दिल्ली आणि अहमदाबादमध्ये सुरू आहे. तर पुढील टप्प्यातील सामने कोलकाता आणि बेंगलोरमध्ये होणार आहेत. तसेच प्लेऑफ आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतातील प्रत्येक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परंतु मुंबईचा रिकव्हरी रेट वाढला आहे. तसेच नवीन रुग्णदेखील कमी सापडत आहेत. त्यामुळे बीसीसीआय मुंबईतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ‘थाला’च्या चेन्नईचा राजस्थानविरुद्ध आगामी सामना खेळण्यास नकार, बीसीसीआयला दिली माहिती?
केकेआरच्या खेळाडूवर कोसळला संकटाचा डोंगर, आधी टीममेट कोरोना पॉझिटिव्ह; मग जवळच्या नातेवाईकाने निधन
आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल; आज होणाऱ्या सामन्यावर टांगती तलवार






