मागील काही वर्षापासून भारतीय क्रिकेट संघ एकाच वेळी दोन ठिकाणी खेळताना दिसला आहे. कोविड काळात प्रमुख भारतीय संघ इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी गेला असताना, शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरा संघ श्रीलंकेत खेळत होता. त्यानंतरही भारतीय संघावर अशी वेळ आली होती. आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा भारतीय संघ अशाच प्रकारे दोन ठिकाणी खेळताना दिसेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताचे पुरुष व महिला संघ पाठवण्याचा निर्णय घेतला असून, या स्पर्धेत भारताचा दुसरा संघ खेळेल.
चीनमधील हॅंगझू येथे 20 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत एशियन गेम्स खेळल्या जाणार आहेत. या स्पर्धेत पुरुष व महिला क्रिकेटचे टी20 सामने खेळले जातील. सुरुवातीला बीसीसीआयने पुरुष संघ पाठवण्यास नकार दिलेला. मात्र, आता बीसीसीआयने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून भारताचा पुरुष संघदेखील या स्पर्धेत खेळताना दिसेल.
ही स्पर्धा ज्या कालावधीत होणार आहे त्या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत असेल. याव्यतिरिक्त वनडे विश्वचषकातील सराव सामने याच वेळेत होणार आहेत. भारतातच आयोजित होत असलेल्या वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होईल.
भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख फलंदाज विश्वचषकासाठीच्या संघात असल्याने या स्पर्धेत भारताचे युवा खेळाडू दिसू शकतात. आयपीएलमध्ये चमकलेल्या अनेक खेळाडूंना येथे संधी मिळू शकते. 1998 क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघ सहभागी झाला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वातील एक संघ टोरंटो येथे तर अजय जडेजाच्या नेतृत्वातील भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत होता. मात्र, या स्पर्धेत भारताला पदक जिंकण्यात अपयश आलेले.
(BCCI Confirmed They Send Men And Women Team For 2023 Asian Games China)
महत्वाच्या बातम्या-
MPL: कोल्हापूर टस्कर्सचा नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय! मनोज-अंकित विजयाचे शिल्पकार
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची 40 वर्षे