संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम खेळला जात आहे. आतापर्यंत या हंगामाच्या साखळी फेरीतील ४२ सामने पार पडले आहेत. साखळी फेरीतील अजून १४ सामने शिल्लक असून ८ ऑक्टोबर रोजी शेवटचा सामना होईल. त्यानंतर प्लेऑफमधील सामन्यांस सुरुवात होईल. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वेळापत्रकात थोडा बदल केला आहे.
८ ऑक्टोबर रोजी होणारे शेवटचे २ साखळी फेरी सामने एकाच वेळी घेणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होणार आहे. मंगळवारी (२८ सप्टेंबर) त्यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.
परंतु यानंतर बीसीसीआयने हा निर्णय का घेतला असावा? एकाच वेळी २ सामने घेतल्याने काय होईल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही इथे प्रयत्न केला आहे.
बीसीसीआयच्या एकाचवेळी २ सामने खेळवण्याच्या निर्णयामागे एक मोठे कारण विवादांना टाळण्याचा प्रयत्न हे असू शकते. मुळात, साखळी फेरीतील शेवटच्या २ सामन्यांमुळे संघांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची स्पर्धा खूप चुरशीची बनते. बऱ्याचदा नेट रन रेटमुळे एखादा संघ अंतिम ४ क्रमांकावर स्थान मिळवण्यात यशस्वी होतो; तर काहींची ती संधी हुकते. त्यातही जर वेगवेगळ्या वेळी सामने झाले तर, जे संघ प्लेऑफमध्ये पोहोचतात, ते नंतर जास्त ताकदीने खेळताना दिसत नाहीत. किंवा मग कमकुवत संघांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात.
आयपीएल २०२१ दरम्यान असाच काहीसा वाद पाहायवयास मिळाला होता. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघांचे गणित असे होते की, विराट कोहलीच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी १८ व्या षटकाच्या आधीच सामना जिंकायचा होता. याच कारणास्तव दिल्ली कॅपिटल्सच्या अजिंक्य रहाणेने कासवगतीने फलंदाजी केल्याची चर्चा होती. यामुळे कोलकाता संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. अशाचप्रकारचा वाद पुन्हा पेटू नये म्हणून बीसीसीआयने हा पर्याय निवडला असावा.
याव्यतिरिक्त टीआरपी हादेखील या निर्णयामागचा एक सबब असू शकतो. कारण टिव्हीवर दुपारच्या सामन्यांना संध्याकाळीच्या सामन्यांच्या तुलनेत तितका टीआरपी नसल्याचे समजते. त्यामुळे स्टार इंडियाने बीसीसीआयकडे एकाच वेळी २ सामने घेण्याचा प्रस्ताव मांडला असल्याची वृत्ते आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या पराभवाने विजयी मुंबईला धक्का, टॉप-४ मध्ये उडी घेण्याची हुकली संधी; पाहा अपडेटेड गुणतालिका
अखेर हास्य परतलं; सलग ३ पराभवांनंतर मुंबईच्या ताफ्यात आनंदाची लहर, रितीका-नताशाचीही खुलली कळी
VIDEO: जब मिले दो जिगरी यार! कोलकाता-दिल्ली सामन्यापूर्वी मैदानावर शिखरची हरभजनला कडाडून मिठी