चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरू असलेला वाद आता वाढतच चालला आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेबाबत सातत्यानं नवीन अपडेट्स समोर येत आहेत. बीसीसीआयनं वारंवार सांगितलंय की, भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. ते हायब्रीड मॉडेलच्या समर्थनार्थ आहे. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे सतत नाकारत आहे. परंतु अलीकडेच त्यांनी काही अटींसह हे मॉडेल मान्य करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता यापैकी एका अटीबाबत बीसीसीआयनं आयसीसीला कडक संदेश पाठवला आहे.
पीसीबीनं हायब्रीड मॉडेलसाठी काही अटी ठेवल्या होत्या. यात त्यांनी भविष्यात भारतात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्येही हे मॉडेल अवलंबलं जावंं असं म्हटलं होतं. मात्र बीसीसीआयनं आयसीसीला स्पष्टपणे सांगितलं आहे की ते हायब्रिड मॉडेल कधीही स्वीकारणार नाहीत. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, बीसीसीआयनं आयसीसी पुढे असा युक्तिवाद केला आहे की, भारतात सुरक्षेला कोणताही धोका नाही मग त्यांनी हायब्रीड मॉडेल का स्वीकारावे? येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, बीसीसीआयनं प्रत्येक वेळी पाकिस्तानात न जाण्यामागे सुरक्षा धोक्याचं कारण दिलं आहे. यावेळी पीसीबीला बीसीसीआयकडून याबाबत लेखी पत्र हवे होतं, परंतु भारतीय बोर्डानं तेही दिलेलं नाही.
पुढील वर्षी महिला वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. यानंतर भारत 2026 मध्ये श्रीलंकेसह टी20 विश्वचषक आयोजित करणार आहे. याशिवाय 2029 मध्ये पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर 2031 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही भारतात आयोजित होणार आहेत. भारताला पुढील दोन वर्षांत दोन मोठ्या आयसीसी स्पर्धांचं आयोजन करायचं आहे.
यावेळी पीसीबीनं आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काय घडत आहे ते पाहता भारताला पुढील दोन स्पर्धांमध्येही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, बीसीसीआयनं सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट ठेवली असून ते आयसीसीलाही त्यांचं मत पटवून देतील अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा –
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! भारताला एकहाती जिंकवून दिला सामना
दिवस-रात्र कसोटीत गुलाबी चेंडू का वापरतात? लाल आणि गुलाबी चेंडूत काय फरक असतो? सर्वकाही जाणून घ्या
विराट कोहली नाही तर हा खेळाडू बनू शकतो आरसीबीचा नवा कर्णधार!