यावर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या विश्वचषकासाठी आता फक्त पाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघही त्यादृष्टीने तयारी करत आहे.
पण या विश्वचषकाआधी आयपीएलचा 12 वा मोसम पार पडणार असल्याने खेळाडूंच्या विश्रांतीचा प्रश्न भारतीय संघासमोर उभा राहणार आहे. विश्वचषक स्पर्धा 30 मे पासून सुरु होणार आहे. तर त्याच्या फक्त 10 दिवस आधी आयपीएल 2019 ची स्पर्धा संपणार आहे.
त्यामुळे बीसीसीआय कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे की भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही विश्वचषकाआधी विश्रांतीची गरज आहे.
त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी कोहली आणि प्रशिक्षकांनी वेगवान गोलंदाजांना आयपीएल दरम्यान विश्रांती देण्यात यावी अशी मागणी केली होती.
याबद्दल हिंदूस्तान टाइम्सशी बोलताना बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी म्हणाले, ‘जशी जसप्रीत बुमराहला विश्रांतीची गरज आहे तशी विराटला पण आहे. जर तूम्ही मागील काही महिने पाहिले तर तो खांद्याच्या दुखापती व्यतिरिक्त बाहेर नव्हता.’
‘विराट हा मैदानात कोणत्याही गोलंदाजांपेक्षा जास्त वेळ आहे. चार षटके गोलंदाजी टाकल्यानंतर त्यांना(गोलंदाजांना) विश्रांती द्यायची? मला वाटते आपले गोलंदाज त्यापेक्षा जास्त फिट आहेत. कदाचीत आपण वरच्या फळीतील फलंदाजांना विश्रांती देण्याचा विचार करायला हवा.’
त्यामुळे आता बीसीसीआय वेगवान गोलंदाज तसेच महत्त्वाच्या फलंदाजांना आयपीएल दरम्यान विश्रांती देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.