जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम संपल्यानंतर सर्व क्रिकेटप्रेमींना या स्पर्धेच्या पुढील हंगामाचे वेध लागले आहेत. आयपीएलच्या पुढील हंगामात आणखी दोन संघांचा समावेश केला जाणार असून, याबाबतची प्रक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुरू केली आहे. दोन नव्या संघांसाठी निविदा मागवल्या असून, परदेशातूनही यासाठी चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या दोन संघांच्या समावेशानंतर बीसीसीआयला किती रक्कम मिळू शकते, याबाबतचा एक आकडा समोर आला आहे.
सोमवारी होऊ शकते घोषणा
बीसीसीआय २५ ऑक्टोबर रोजी नव्या संघांची घोषणा करेल. दोन नव्या संघांची मालकी घेण्यासाठी भारतातील तसेच विदेशातील अनेक उद्योगपती व संस्थांनी रस दाखवला आहे. अदानी ग्रुप, अरबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा, संजीव गोयंका, रॉनी स्क्रूवाला, रणवीर सिंग-दीपिका पदुकोण व जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब मॅंचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेसर कुटुंबीय तसेच इतर अनेकांनी यासाठीची कागदपत्रे खरेदी केली आहेत. सध्या दोन नवे संघ म्हणून अहमदाबाद व लखनौ यांची वर्णी लागू शकते असे म्हटले जात आहे. मात्र इंदोर, धर्मशाला, रांची व कोची ही शहरे देखील या शर्यतीत आहेत.
इतक्या रकमेची बीसीसीआयला अपेक्षा
या प्रकरणाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितले की, “गौतम अदानी आणि संजीव गोयंका ही भारतीय उद्योगातील सर्वात मोठी नावे आहेत. ते अत्यंत गंभीरतेने बोली लावतील. बोली लावणाऱ्या दावेदारांकडून किमान ३५०० कोटी रुपये मिळू शकतात. आम्हाला या दोन्ही फ्रॅंचाईजीकडून प्रत्येकी ७००० ते १००० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.”
संजीव गोयंका यांच्या मालकीच्या आरपीजी समूहाने २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट संघ खरेदी केला होता. या संघाने सलग दोन हंगामात सहभाग नोंदविलेला. तसेच ते इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेमध्ये एटीके मोहन बागान संघाचे मालक आहेत.