आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ आणि २०२३ वनडे विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांना अगोदरपासूनच चिंता सतावत आहे. ती म्हणजे भारतात येण्यासाठी व्हिसा घेण्याची परवानगी.
वसीम खानने (Wasim Khan) आयसीसीला पत्र लिहून म्हटले आहे, की टी२० विश्वचषक आणि २०२३ वनडे विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात गेल्यावर खेळाडूंचा व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची बीसीसीआयने खात्री द्यावी. आता यावर बीसीसीआयने पाकिस्तान बोर्डाच्या या आव्हानास चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) म्हटले आहे, की पीसीबीने प्रथम हमी द्यावी की भारतात कोणताही दहशतवादी हल्ला होणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नाहीत. अशा परिस्थितीत केवळ आयसीसी स्पर्धेतच हे दोन संघ आमने सामने येतात.
बीसीसीआयने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली, “आयसीसीच्या नियमांनुसार हा खेळ चालविण्यात कोणताही सरकारी हस्तक्षेप होणार नाही. ही गोष्ट क्रिकेट बोर्डावरही लागू होते. त्यांनी सरकारच्या कामात अडचणी निर्माण करू नयेत. पीसीबीने भारतीय मंडळाकडून आश्वासन मागण्यापूर्वी त्यांनी सीमेवर कोणताही दहशतवादी हल्ला होणार नाही याची हमी लिहून द्यावी.”
“पाकिस्तानच्या बाजूने कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही आणि युद्ध उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी पाकिस्तान सरकार घेईल. याची लेखी हमी देऊ शकेल का? भारताच्या भूमीवर कोणतेही दहशतवादी कारवाया होणार नाहीत आणि पुलवामासारखी घटना पुन्हा पाहायला मिळाली नाही पाहिजे, “असे ते म्हणाले.
पीसीबीला उत्तर देताना अधिकाऱ्याने पुढे म्हटले, “आयसीसीचा नियम आहे की क्रिकेट मंडळाच्या कामात सरकारने हस्तक्षेप करू नये आणि क्रिकेट मंडळानेही सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये. पीसीबीनेही हे समजून घेतले पाहिजे आणि आयसीसीमध्ये भारताविरूद्ध काम करणारा संघ म्हणून उपस्थित राहणे त्यांनी थांबवावे. मी एवढंच सांगू शकतो की भारत एक अतिशय चांगला देश आहे. आणि अतिशय संतुलित मार्गाने कार्य करतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला
-या ५ भारतीय क्रिकेटर्सचे हमशकल पाहिलेत का? पाहून तुम्हीही व्हाल दंग
-३ षटकांत शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज, मारले होते तब्बल २९ चौकार






