भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुन्हा एकदा भारतीय पुरुष संघासाठी तिजोरी उघडली आहे. टी२० विश्वचषक २०२६ जिंकल्याबद्द्ल बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी मोठ्या रकमेचे बक्षिस जाहीर केले आहे. भारताने ८ मार्चला अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा दारुण पराभव केला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या त्या सामन्यात भारत ९६ धावांनी जिंकला होता. त्यामुळेच मंगळवारी (१० मार्च) बीसीसीआयने बक्षिस रक्कम जाहीर केली.
बीसीसीआयने मीडियामध्ये सांगितले की आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये संघाने उत्तम कामगिरी करत पुन्हा एकदा विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे बोर्ड त्यांच्यासाठी १३१ कोटी रुपयांची बक्षिस रक्कम जाहीर करत आहे. भारताने हा विश्वचषक जिंकल्याबरोबर अनेक विक्रमांना गवसणी घातली. संघ तीन वेळा टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला. घरच्या मैदानावर विजेतेपद जिंकणे आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणे अशा अनेक मोठ्या विक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.
भारताने या स्पर्धेत सर्व साखळी सामने जिंकत धमाक्यात सुपर-८मध्ये प्रवेश केला होता. त्यामधील पहिल्याच सुपर-८ सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. नंतर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध सलग दोन सुपर-८ सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तेथे इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत पुन्हा एकदा टी२० चॅम्पियन ठरला.
या स्पर्धेत भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचे योगदान म्हणून बीसीसीआयने त्यांचे कौतुक केले आहे आणि त्यांच्यासाठी ही बक्षिस रक्कम जाहीर केली आहे.
या स्पर्धेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले होते. तसेच संजू सॅमसन याने अनेक महत्वाच्या सामन्यात सलामीला येत संघाच्या विजयामध्ये मोठी भुमिका पार पाडली. उपकर्णधार अक्षर पटेल यानेही इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
या स्पर्धेत शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह ‘प्लेयर ऑफ द मॅच’ आणि संजू ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ (मालिकावीर) ठरला. या स्पर्धेच्या इतिहासात हा पुरस्कार जिंकणारा संजू तिसरा भारतीय ठरला आहे. त्याच्याआधी बुमराह आणि विराट कोहली यांनी टी२० विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत.






