भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयमध्ये जॉब व्हॅकेंसी निघाली आहे. बीसीसीआयला मार्केटिंगसाठी जनरल मॅनेजरची आवश्यकता आहे. बोर्डानं या रिक्त पदाचा तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे. या पदावर नेमणूक होणाऱ्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल, असं बीसीसीआयनं सांगितलंय. या पदासाठी कोण अर्ज करू शकतो हेही बोर्डानं सांगितलं आहे.
बीसीसीआयमधील जनरल मॅनेजरचं काम मार्केटिंगशी संबंधित असेल. त्याला मार्केटिंगबाबत संपूर्ण रणनीती बनवावी लागेल. त्याला मार्केटिंगसाठी कँपेनही तयार करावं लागेल. त्यासाठी अर्जदार किमान पदव्युत्तर पदवीधर असणं आवश्यक आहे. यासोबतच त्याचं वय 55 वर्षांपेक्षा कमी असावं. अर्जदाराकडे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स किंवा डिप्लोमा देखील असणं आवश्यक आहे. अनुभवाबद्दल बोलायचं झालं तर, या पदासाठी अर्जदाराकडे 15 वर्षांचा अनुभव असणंही आवश्यक आहे.
पगाराबद्दल बोलायचं झालं तर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना खूप चांगला पगार मिळतो. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, बीसीसीआयच्या जनरल मॅनेजरला 3 ते 4 कोटी रुपये पगार मिळतो. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांचे पगारही खूप जास्त आहेत.
जर तुम्हाला बीसीसीआयच्या जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बोर्डाच्या अधिकृत ईमेलवर बायोडाटा पाठवावा लागेल. या पदासाठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंतच अर्ज करता येतील. त्यानंतर ही प्रक्रिया थांबवली जाईल. सध्या माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. तर जय शाह बोर्डाचे सचिव आहेत.
भारतीय क्रिकेट संघ नुकताच श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. येथे भारतानं टी20 मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. मात्र एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला 2-0 असा पराभव पत्करावा लागला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला होता. मात्र यानंतर श्रीलंकेनं सलग दोन सामने जिंकून मालिकेवर कब्जा केला.
हेही वाचा –
भारतीय कुस्तीपटूवर लागू शकते 3 वर्षांची बंदी! काय आहे संपूर्ण प्रकरण?
पदक जिंकल्यानंतर मनू भाकरवर पैशांचा वर्षाव, क्रीडामंत्र्यांनी दिला इतक्या रुपयांचा धनादेश
विनेश फोगटवर सरकारने केला चक्क इतका खर्च, आकडा जाणून बसेल धक्का