पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन करत आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? हा सर्वात मोठा मुद्दा आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याच्या मनस्थितीत नाही. आता यामागील कारण समोर आलं आहे. बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) एक पत्र लिहिलं, ज्या पत्राद्वारे बोर्डानं टीम इंडियाला पाकिस्तानात का पाठवायचं नाही, हे स्पष्ट केलंय.
‘स्पोर्ट्स तक’च्या अहवालानुसार, बीसीसीआयनं सुरक्षेच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं आहे. बोर्डानं आयसीसीला सविस्तर कागदपत्र पाठवले असून, त्यात पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख आहे. या दस्तऐवजात पाकिस्तानमधील सीमेपलीकडील दहशतवाद आणि भारतीय क्रिकेट संघाविरोधातील संभाव्य उच्च धोक्याबद्दल चर्चा करण्यात आली. बीसीसीआयचा असा विश्वास आहे की, सामान्य पाकिस्तानी जनतेनं जरी स्वागत केलं, तरीही टीम इंडिया दहशतवाद्यांचं संभाव्य लक्ष्य बनू शकते, जसं 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघासोबत घडलं होतं. याशिवाय या अहवालात गेल्या वर्षभरात पाकिस्तानात घडलेल्या अनेक दहशतवादी घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
भारतानं 2006 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. पाकिस्तानला न जाण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं म्हटलं की, ‘हायब्रिड मॉडेल’द्वारे होस्टिंग करणं शक्य होणार नाही. पीसीबीचं म्हणणं आहे की, जरी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तरी संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्येच आयोजित केली जाईल.
पीसीबी आणि बीसीसीआयच्या कठोर भूमिकेमुळे आता आयसीसीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी आयसीसीकडे तीन पर्याय आहेत. प्रथम, चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून दुसऱ्या देशाला द्यावं. असं केल्यास पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आपलं नाव मागे घेऊ शकते. दुसरं म्हणजे, पीसीबीकडून बीसीसीआयच्या प्रस्तावित ‘हायब्रीड मॉडेल’ला सहमती मिळवणे, ज्या अंतर्गत 15 पैकी 5 सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित केले जातील. तिसरं, चॅम्पियन्स ट्रॉफी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलणे. या निर्णयामुळे आयसीसी आणि पीसीबी दोघांचंही आर्थिक नुकसान होऊ शकतं, कारण या स्पर्धेतून मोठी कमाई अपेक्षित आहे.
हेही वाचा –
विराट कोहलीला दुखापत झाली का? कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियातर्फे माइंड गेम सुरू
पहिल्या कसोटीपूर्वी भारताचे दिग्गज फलंदाज फ्लॉप! नवख्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्कारली
रिषभ पंतचा बाउन्सर, जसप्रीत बुमराहचा षटकार? सरावादरम्यानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल