बीसीसीआयनं अलीकडेच कसोटी क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. आता भारतीय क्रिकेटपटूंना कसोटी सामने खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसाठीही मोठी माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय रणजी करंडक खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचं मानधन वाढवण्याचा विचार करत आहे. यावर लवकरच मोठा निर्णय होऊ शकतो. बीसीसीआय लाल बॉल क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहे. या अंतर्गत रणजी क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाला लवकरच मंजुरी मिळू शकते.
सध्या बीसीसीआय रणजी ट्रॉफी क्रिकेटपटूंना 40,000 ते 60,000 रुपये प्रतिदिन मॅच फी म्हणून देते. मात्र हे सर्व हंगामात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांच्या संख्येवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, जर एखादा खेळाडू एका हंगामात सर्व सात गट सामने खेळला तर त्याला वर्षाला सुमारे 11.2 लाख रुपये मिळतात. वास्तविक, आयपीएलमुळे अनेक मोठे खेळाडू रणजी करंडक खेळण्याचं टाळतात. परंतु आता बीसीसीआय आपल्या नव्या रणनीतीवर काम करत आहे.
आयपीएल 2024 साठी 156 भारतीय क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्यात आले होतं. ज्यामध्ये असे 56 खेळाडू होते ज्यांनी रणजी ट्रॉफीचा एकही सामना खेळला नाही. तर 25 खेळाडू असे होते ज्यांनी फक्त 1 सामना खेळला. मात्र, आता यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. यावर लवकरच मोठा निर्णय होणार असल्याचं मानलं जातंय.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी बीसीसीआयकडे देशांतर्गत क्रिकेटपटूंना, विशेषत: प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिप्पटीनं वाढ करण्याची मागणी केली होती. रणजी करंडक क्रिकेटपटूंच्या पैशात वाढ करण्याचा निर्णय मंजूर झाल्यास त्याचा खेळाडूंवर कितपत परिणाम होईल, हे पाहणं रंजक ठरणार आहे. यानंतर मोठे भारतीय खेळाडू आयपीएलपेक्षा देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देतील का? हाही मोठा सवाल आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“बीसीसीआयनं रणजी खेळाडूंच्या मानधनात तिप्पटीनं वाढ करावी”, सुनील गावसकर यांची मागणी
नरेंद्र मोदी स्टेडियम नाही तर ‘या’ मैदानावर होऊ शकतो IPL 2024 चा अंतिम सामना; लवकरच घोषणा
शाहरुख खान पुन्हा वादात! आयपीएल सामन्यादरम्यान उघडपणे केलं धुम्रपान