भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानादेखील आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसात खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कालपासून दोन सामने देखील रद्द करण्यात आले होते. आज अखेर बीसीसीआयने निर्णय घेत आयपीएलचा चौदावा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. मात्र पुन्हा इतरत्र बायो बबलमध्ये उर्वरित सामने खेळवण्याचा विचार चालू आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील सामने मुंबई आणि चेन्नईमध्ये खेळवले गेले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येत होते. मात्र सोमवारी (३ मे) कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडू, चेन्नई सुपर किंग्ज संघातील ३ सदस्य आणि अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच बीसीसीआयने हंगाम तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र असे असले तरी बीसीसीआय आयपीएल स्पर्धेतील पुढील सामने मुंबईमध्ये खेळवण्याचा विचार करत आहे. ७ मेपासून आगामी सामने मुंबईत हलवण्यात येणार असल्याचे समजत आहे. याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केली गेली नाहीये.
मुंबईत आयपीएल स्पर्धा खेळवण्यामागचे कारण
बीसीसीआयने जर हा निर्णय घेतला तर, त्यामागे काही कारणं असू शकतात. मुंबईमध्ये तीन क्रिकेट स्टेडियम आहेत. हे सर्वात मोठे कारण असू शकते. मुंबईत वानखेडे स्टेडियम, ब्रेबोन स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम आहेत. त्यामुळे इथे व्यवस्थितरित्या आयपीएल २०२१ च्या पुढील सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.

वेळापत्रकात होऊ शकतो बदल
जर आयपीएल २०२१ चा हंगाम मुंबईत स्थलांतरित करण्यात आला, तर वेळापत्रकात काही बदल होऊ शकतो. ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना ३० मेला अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. तो पुढे ढकलून जूनच्या पहिल्या आठवड्यात खेळवला जाऊ शकतो. अहमदाबादच्याच मैदानावर प्लेऑफचे सामने होणार आहेत. याद्वारे बीसीसीआय प्रवास करण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात आहे.
कसा असेल संघाचा प्रवास
आयपीएलचा दुसरा टप्पा दिल्ली आणि अहमदाबादमध्ये सुरू आहे. तर पुढील टप्प्यातील सामने कोलकाता आणि बेंगलोरमध्ये होणार आहेत. तसेच प्लेऑफ आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतातील प्रत्येक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परंतु मुंबईचा रिकव्हरी रेट वाढला आहे. तसेच नवीन रुग्णदेखील कमी सापडत आहेत. त्यामुळे बीसीसीआय मुंबईतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! कोरोनामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द
केकेआरच्या खेळाडूवर कोसळला संकटाचा डोंगर, आधी टीममेट कोरोना पॉझिटिव्ह; मग जवळच्या नातेवाईकाने निधन
आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल; आज होणाऱ्या सामन्यावर टांगती तलवार




