भारतीय खेळाडू आणि त्यांच्या आलिशान राहणीमानाबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. खेळाडूंनी कोणतीही नवीन गोष्ट खरेदी केली, तर चाहत्यांना ती जाणून घेण्यासाठी नेहमीच तयार असतात. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने कोलकाता येथे एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. गांगुली आणि त्याचे कुटुंब कोलकातामधील आपले ४८ वर्षे जुने वडिलोपार्जित घर सोडून नवीन घरात गेला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने खरेदी केलेल्या या घराची किंमत तब्बल ४० कोटी रुपये आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) म्हणाला की, “आपल्या नवीन घरामुळे खूप खुश आहे. कुटुंबासोबत राहणे खूपच सुखद असते. मलाही हेच वाटते. मात्र, सर्वात कठीण काम ती जागा सोडणे आहे, जिथे मी ४८ वर्षे राहिलो आहे.” माध्यमांतील वृत्तांनुसार, गांगुलीने लोअर रॉडन स्ट्रीटवर दोन मजली इमारत असलेला २३.६ कोटाची जमीन ४० कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
Sourav Ganguly's new home pic.twitter.com/vGigNQUqjZ
— Akash Kharade (@cricaakash) May 20, 2022
घर बदलल्यामुळे गांगुलीला फायदा
घर बदलल्यामुळे गांगुलीला (Sourav Ganguly New House) दोन प्रकारचा फायदा होऊ शकतो. एक म्हणजे, त्याचे घर शहरांच्या मधोमध आहे. त्यामुळे त्याला कुठेही येण्या-जाण्यामध्ये जास्त सुविधा मिळतील. याव्यतिरिक्त रॉडन स्ट्रीट परिसर हा खूप शांत आणि सुसज्ज आहे. माजी भारतीय कर्णधार गांगुली आपल्या या नवीन घरामुळे खूप खुश आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने तो भावूकही आहे. कारण, त्याने ४८ वर्षे जुने आपले वडिलोपार्जित घर सोडले आहे.
तो म्हणाला की, “माझे स्वत:चे घर असल्याने मी खुश आहे. इथे राहणे सुविधापूर्ण असेल, पण सर्वात कठीण काही असेल, तर ते म्हणजे मी ४८ वर्षांपासून काम करत असलेली जागा सोडणे.” हे वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले आहे.