आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलावा आयोजित केला आहे. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) या मेगा लिलावात सहभागी होण्यासाठी बेंगलोरमध्ये उपस्थित आहेत. परंतु लिलावासाठी ते आता उपस्थित राहतील, याची खूपच कमी शक्यता आहे. शुक्रवारी गांगुलींना बेंगलोरच्या के नारायणा हेल्थ सिटी रुग्णालयात ह्रदयाच्या तपासणीसाठी भरती झाले आहेत.
के नारायणा हेल्थ सिटी रुग्णालयाचे डॉक्टर देवी शेट्टी आणि त्यांची संपूर्ण टीम गांगुलींची तपासणी करत आहे. हे तेच डॉक्टर आहेत, ज्यांना मागच्या वेळी गांगुलींवर उपचार केले होता. याच पार्श्वभूमीवर मेगा लिलावासाठी गांगुली उपस्थित राहतील, याची कसलीही शाश्वती देता येणार नाही. शनिवारी आणि रविवारी बेंगलोरमध्येच मेगा लिलाव आयोजित केला गेला आहे. या लिलावासाठी बीसीसीआय अध्यक्षांनी बेंगलोर दौरा केला होता, पण आता शक्यतो त्यांना लिलावात सहभागी होता येणार नाही.
मागच्या वर्षी गांगुलींना अनेकदा रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली होती. मागच्या वर्षी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळे कोलकातामध्ये त्यांच्यावर एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली गेली होती. एक नाही तर दोन वेळा त्यांना एंजिओप्लास्टी करावी लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती केले गेले होते. मागच्या महिन्यात गांगुलींना कोरोनाची लागण झाली होती आणि कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात त्यांना भरती केले गेले. काही दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर त्यांना सोडले गेले.
दरम्यान, यावर्षी लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता स्पर्धेत आठ ऐवजी १० संघ एकमेकांसमोर असतील. मेगा लिलावात एकूण ५९० खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यपैकी एकूण ३७० भारतीय आहेत, तर २२० विदेशी खेळाडू आहेत.