भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं आयपीएल 2023 मधून भरपूर उत्पन्न मिळवलं आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच बीसीसीआयनं एका हंगामात 5000 कोटींहून अधिक रुपये कमावले. आयपीएल 2022 मध्ये हीच कमाई सुमारे 2300 कोटी रुपये होती. अशाप्रकारे आयपीएल आता जगातील दुसरी सर्वात जास्त कमाई करणारी लीग बनली आहे.
‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार, बीसीसीआयनं आयपीएल 2023 मधून 5120 कोटी रुपयांची कमाई केली. त्याच वेळी, बोर्डानं आयपीएल 2022 मध्ये 2367 कोटी रुपये कमावले होते. म्हणजेच, एका वर्षात बीसीसीआयची कमाई 116 टक्क्यांनी वाढली आहे. अहवालात म्हटलं आहे की, ही वाढ मुख्यत्वे नवीन मीडिया हक्क आणि प्रायोजक सौद्यांमुळे झाली, जी आयपीएल 2023 पासून लागू झाली आहे.
अहवालानुसार, या उत्पन्न वाढीत मीडिया हक्कांच्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे, जो गेल्या वर्षीच्या 3,780 कोटींवरून 131 टक्क्यांनी वाढून 8,744 कोटी रुपये झाला. बीसीसीआयनं 2023-2027 आयपीएल सायकलसाठी एकूण 48,390 कोटी रुपयांचे मीडिया राइट्स मिळवले. यामध्ये डिस्ने स्टारनं 23,575 कोटी रुपयांचे टीव्ही अधिकार आणि जिओ सिनेमानं 23,758 कोटी रुपयांचे डिजिटल अधिकार मिळवले. याव्यतिरिक्त, आयपीएलचे शीर्षक हक्क टाटा सन्सला पाच वर्षांच्या कालावधीसाठी 2,500 कोटी रुपयांमध्ये विकले गेले. त्याच वेळी, MyCircle11, RuPay, AngelOne आणि Ceat सारखे प्रायोजक आहेत, ज्यातून बोर्डानं आणखी 1,485 कोटी रुपये कमावले.
अहवालात असंही म्हटलं आहे की, 2023 मध्ये सुरू झालेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) मुळे देखील बीसीसीआयच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे. महिला प्रीमियर लीगद्वारे बोर्डाला 377 कोटी रुपयांचं जास्तीचं उत्पन्न मिळालं. लिगचं एकूण उत्पन्न 636 कोटी रुपये आहे, ते मीडिया अधिकार, फ्रेंचायझी फी आणि प्रायोजकांकडून आलं. तर खर्च 259 कोटी रुपये आहे.
हेही वाचा –
जय शाह बनणार आयसीसीचे नवे अध्यक्ष? लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता
इंग्लंडमध्ये श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये आग! जिवाच्या आकांताने बाहेर पडले खेळाडू, नेमकं काय घडलं?
महिला टी20 विश्वचषकाबाबत आयसीसीचा मोठा निर्णय, बांगलादेशऐवजी ‘या’ ठिकाणी होणार सामने