---Advertisement---

भारतीय खेळाडूंच्या सततच्या दुखापतींमुळे बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

On: शनिवार, ऑगस्ट 8, 2026 7:16 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. खेळाडूंच्या सततच्या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. कर्णधार शुभमन गिल यानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता ही समस्या वाढताना पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया रविवारी ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’ येथे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भेट घेतील आणि खेळाडूंचे ‘रिहॅबिलिटेशन’ आणि दुखापतींमधून सावरण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतील.

​जसप्रीत बुमराह (गुडघ्याला सूज), साई सुदर्शन (डाव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत), हर्षित राणा (स्नायू ताणले जाणे), नितीश कुमार रेड्डी (स्नायू ताणले जाणे) आणि वॉशिंग्टन सुंदर (मांडीचे स्नायू ताणले जाणे) वेगवेगळ्या दुखापतींमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाहीत. आकाश दीप (स्ट्रेस फ्रॅक्चर) सर्वाधिक काळापासून संघाबाहेर आहे. बंगालचा रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीत पराभव झाल्यापासूनच तो संघाबाहेर आहे.

​याशिवाय हार्दिक पांड्या (मांडीचे स्नायू ताणले जाणे), वरुण चक्रवर्ती (स्नायू ताणले जाणे) आणि प्रिन्स यादव (स्नायू ताणले जाणे) हे देखील ‘सीओई’ मध्ये आहेत, जिथे स्पोर्ट्स सायन्स टीमवर कामाचा प्रचंड ताण आहे. २०२५ च्या सुरुवातीला नितीन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर या विभागाला कोणताही प्रमुख नाही. सध्या सर्व खेळाडूंना शक्य तितक्या लवकर पूर्णपणे तंदुरुस्त करून मैदानावर परत आणणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

​बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, “होय, सचिव सैकिया परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बंगळुरूमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भेट घेतील. दोघांमध्ये एक बैठक निश्चित झाली आहे. राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर किंवा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर ऑनलाइन या बैठकीत सहभागी होतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एवढ्या सगळ्या चर्चांनंतर आता सैकिया आणि लक्ष्मण प्रसारमाध्यमांच्या काही प्रश्नांना सामोरे जाऊन त्यांची उत्तरे देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.”

​हर्षित राणा इंग्लंडमध्ये पोहोचला तेव्हा त्याचे वजन खूप जास्त असल्याचा प्रकारही निवड समितीला आवडलेला नाही. त्याचप्रमाणे, निवड समितीला सुरुवातीला सांगण्यात आले होते की बुमराह आणि सुदर्शन कमीत कमी दोन कसोटी सामन्यांपैकी एका सामन्यासाठी उपलब्ध असतील. मात्र, परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर समजले की दुखापतीनंतर बुमराहच्या गुडघ्यात सूज येत आहे, ज्यामुळे त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी अधिक वेळ लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---