कोराना व्हायरसचा धोका लक्षात घेता भारतात लॉकडाऊनचा कालावधी १४ दिवसांनी वाढवण्यात आला असून आता ३१ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटूंच्या सराव शिबिरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट दिले आहेत.
चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहण्यासाठी बंदी असेल. यातून हे सूचित होते की खेळाडू त्यांचे वैयक्तिक प्रशिक्षण सुरू करू शकतात परंतु जोपर्यंत प्रवासाचे निर्बंध उठत नाहीत तोपर्यंत मात्र ते प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकत नाहीत.
त्यामुळे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक जाहीर करुन म्हटले आहे की चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या नियमांचा विचार करुन स्थानिक पातळीवर खेळाडूंनी कौशल्य-आधारित प्रशिक्षण सुरू करावे यासाठी बीसीसीआय आपल्या राज्य क्रिकेट संघटनांशी समन्वय साधेल. तसेच खेळाडूंची सुरक्षा हे पहिले प्राधान्य असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
मागील जवळजवळ दोन महिन्यापासून भारतात लॉकडाऊन असल्याने क्रिकेटपटूही आपापल्या घरात आहेत. त्यांना याआधी बाहेर जाऊन सरावासाठी परवानगी मिळालेली नव्हती.
त्याबद्दल बीसीसीआयने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘३१ मे पर्यंत हवाई प्रवास आणि वाहतुकीवरील निर्बंध विचारात घेतल्यास बीसीसीआय करारबद्ध खेळाडूंसाठी कौशल्य-आधारित प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यापूर्वी आणखी प्रतीक्षा करेल. बीसीसीआयचे प्राधान्य त्यांच्या खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांची सुरक्षा आणि आरोग्यास आहे. तसेच व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही बाधा आणेल असे कोणतेही निर्णय घेण्याची घाई बीसीसीआय करणार नाही.’
तसेच पुढे बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘या दरम्यान बीसीसीआय राज्य स्तरावरील मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करेल आणि स्थानिक पातळीवर कौशल्य-आधारित प्रशिक्षण घेण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यासाठी राज्य क्रिकेट संघटनांच्या समन्वयाने कार्य करेल. बीसीसीआयचे अधिकारी संघ व्यवस्थापनाशी संवाद सुरू ठेवतील आणि एकदा परिस्थिती सुधारली की ते संपूर्ण संघासह एकत्र काम करून एक सोपी योजना तयार करतील.’
ट्रेंडिंग घडामोडी –
विराट नाही तर हा खेळाडू म्हणतो; कितीही मोठी ऑफर येऊ द्या, खेळणार तर आरसीबीकडूनच
स्मिथच्या स्फोटक खेळीचा राज त्याचा शूजमध्ये, पुण्यातून झाली होती त्या गोष्टीची सुरुवात
भारतीय सी ग्रेड क्रिकेटपटू करतात पाकिस्तानच्या टाॅप खेळाडूंपेक्षा जास्त कमाई, पहा






