बीसीसीआयनं काही वर्षांपूर्वी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये काही नवे नियम लागू केले होते. मात्र आता या नियमांमध्ये बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. बातम्यांनुसार, बीसीसीआय आता ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमासह आणखी एका नियमाचा आढावा घेणार आहे. हे नियम सुरुवातीला घरगुती स्पर्धांमध्ये लागू करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला.
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाव्यतिरिक्त बीसीसीआय विचार करत असलेल्या दुसरा नियम म्हणजे एका षटकात दोन बाऊन्सर. गेल्या हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोन बाऊन्सर नियम लागू केल्यानंतर, बीसीसीआयनं आयपीएलमध्येही त्याची अंमलबजावणी केली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, तेथे गोलंदाजाला एका षटकात एकच बाऊन्सर टाकण्याची परवानगी आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक गोलंदाज एका षटकात जास्तीत जास्त दोन बाऊन्सर टाकू शकतो. अशा परिस्थितीत बीसीसीआयनं या नियमाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हा चर्चेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या नियमावरून माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांमध्ये अनेक वाद झाले आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर झहीर खान यानं अलीकडेच या नियमाचं समर्थन केलं होतं. तसेच फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं देखील या नियमाला पाठिंबा दिला आहे.
यापूर्वी आयपीएल 2024 दरम्यान रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांसारख्या मोठ्या भारतीय खेळाडूंनी या नियमावर टीका केली होती. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका संपुष्टात येत असल्याचं या खेळाडूंनी म्हटलं होतं. त्यामुळे आता बीसीसीआय या नियमावर कोणता निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
राहुल द्रविडच्या मुलाचा टीम इंडियात प्रवेश; ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा
भारतीय संघाला मोठा धक्का! बुची बाबू स्पर्धेत वर्ल्ड कप हिरो दुखापतग्रस्त
बांगलादेश मालिकेपूर्वी युवा फलंदाजाचं दमदार शतक, कसोटी संघासाठी ठोकला दावा