भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) संघाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला. आधी टी-२० त्यानंतर एकदिवसीय आणि आता कसोटी संघाचे कर्णधारपद देखील विराटने सोडले. अशात आता विराटनंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण बनणार? याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. चाहते आणि अनेक दिग्गजांच्या मते रोहित शर्मा (rohit sharma) ही जबाबदारी स्वीकारेल, परंतु बीसीसीआय याविषयी वेगळा विचार करत असल्याचे समोर येत आहे.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक संपल्यानंतर विराटने स्वतःच्या इच्छेने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून देखील हटवले. टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून विराट पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माने ही जबाबदारी स्वीकारली. अशात आता विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर देखील रोहितच ही जबाबादी सांभाळेल, असा चाहत्यांचा एकंदरीत अंदाज आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआय कसोटी कर्णधारपदासाठी एका नवीन नावावर विचार करत आहे.
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’
बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार निवडकर्त्ये कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी पुन्हा चर्चा करू इच्छितात. ज्या नावांवर कर्णधारपदासाठी चर्चा होणार आहे, त्यापैकी एक केएल राहुल आहे. विराटच्या राजीनाम्यानंतर उपकर्णधाराने ही जबाबादारी स्वीकारणे अपेक्षित आहे. पण निवडकर्ते यावर पुन्हा चर्चा करणार आहेत. यावेळी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या प्रकारात एक कर्णधार असेल की, दोन वेगवेगळे कर्णधार असतील, याविषयी निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, जर तिन्ही प्रकारांमध्ये एक कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला गेला, तर रोहित शर्माकडे ही जबाबादारी येणे निश्चित आहे. तसेच जर कसोटी आणि मर्यादित षटकांमध्ये दोन वेगळेवेगळे कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला गेला, तर केएल राहुलचे नाव कसोटी कर्णधारपदासाठी सर्वात आघाडीवर असेल. राहुल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे ही जबाबादारी सांभाळण्यासाठी तो प्रमुख दावेदार असेल. तसेच उपकर्णधारपदासाठी रिषभ पंतचे नाव चर्चेत आहे.
दुसरीकडे अजिंक्य राहाणेचा विचार केला, तर तो सध्या खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्याकडून काही दिवसांपूर्वी कसोटी उपकर्णधारपद देखील काढून घेतले गेले होते. त्यामुळे तो कर्णधारपदासाठी दावेदार असण्याची शक्यता खूपच कमी आहे.
महत्वाच्या बातम्या –
अंडर-१९ विश्वचषकात ‘यंगिस्तान’चा धमाका, दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत स्पर्धेची केली विजयी सुरुवात
व्हिडिओ पाहा –





