संयुक्त अरब अमिरात येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होताना दिसणार आहेत. विराट कोहली हा टी२० संघाचा कर्णधार पदावरून बाजूला होणार आहे. तर, गेली चार वर्ष भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री हे देखील आपले पद सोडणार आहेत. त्यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर आता बीसीसीआय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी (एनसीए) नवे संचालक म्हणून आणखी एका दिग्गजाला पाचारण करू इच्छित आहे.
हा दिग्गज होणार एनसीए संचालक
राहुल द्रविड यांची वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागल्यानंतर ते सध्या कार्यरत असलेल्या एनसीएचे संचालक पद रिक्त झाले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे क्रिकेट प्रशासनात जास्तीत जास्त माजी खेळाडूंना आणू इच्छितात. त्यामुळे या पदावर भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड करण्यासाठी ते इच्छुक आहेत. गांगुली, द्रविड व लक्ष्मण हे एकेकाळी अनेक वर्ष भारतीय संघाचा एकत्रितरीत्या भाग होते.
बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार,
“बीसीसीआय अध्यक्ष व सचिव जय शहा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी लक्ष्मण यांना एनसीए संचालकपदी पाहू इच्छितात. गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण हे चांगले मित्र असल्याने तसेच, त्यांच्यातील समन्वय उत्कृष्ट असल्याने हे तिघे भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर घेऊन जातील, अशी आम्हाला आशा आहे.”
लक्ष्मण हे सध्या समालोचन व आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे मार्गदर्शक म्हणून काम करतात.
द्रविड बनले मुख्य संघाचे प्रशिक्षक
रवी शास्त्री यांनी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल द्रविड हे भारताचे पुढील प्रशिक्षक असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, द्रविड हे युवा खेळाडूंशी संलग्न राहण्यास इच्छुक होते. त्यानंतर सौरव गांगुली व जय शहा यांनी द्रविड यांची मनधरणी करत त्यांना मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यास सांगितले. अखेर, द्रविड यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना भारताचे मुख्य प्रशिक्षकपद बहाल करण्यात आले. द्रविड यांनी यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या दुय्यम दर्जाच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
जमलं बरं का! राहुलने स्विकारले आथियासोबतचे नाते; होणार सुनील शेट्टीचा जावई
‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी





