---Advertisement---

बीसीसीआय सुधारणार बिहार क्रिकेटची दशा; ‘या’ दोघांवर सोपवली जबाबदारी

On: बुधवार, नोव्हेंबर 24, 2021 12:50 AM
bcci-logo
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांना विजय हजारे चषकादरम्यान बिहारला जाण्यास सांगितले आहे. याअंतर्गत मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा आणि त्यांचे साथीदार अभय कुरुविला बिहारला जाणार आहेत. हे दोघेही बिहारमध्ये होणाऱ्या सामन्यांदरम्यान उपस्थित राहतील. निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची जबाबदारी तसेच संघाशी संबंधित इतर समस्या देखील हे दोघे सांभाळणार आहेत.

पुढील महिन्यापासून विजय हजारे चषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. बिहार क्रिकेट अलिकडच्या वर्षांत बऱ्याच चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. खेळाडूंना पैसे न देणे, बीसीसीआयच्या नकारानंतरही टी२० लीग आयोजित करणे, खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत अनियमितता, यामुळे बिहार क्रिकेटची बदनामी झाली आहे.

बातमीनुसार, बिहार क्रिकेटमध्ये देखरेखीची गरज आहे. म्हणून चेतन शर्मा आणि अभय कुरुविला यांना पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे, की कोणत्याही राज्य संघटनांमध्ये भांडणे असतील तर बीसीसीआय ते प्रकरण स्वतःच्या हातात घेईल आणि समस्या सोडवेल. बीसीसीआय गेल्या वर्षभरापासून बिहार क्रिकेटबद्दल चिंतेत आहे. येथे खेळाडूंना नियमित पैसे मिळालेले नाहीत. गेल्या दोन हंगामात खेळाडू पैशांशिवाय खेळत होते. असोसिएशनमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे ही समस्या वाढली आहे.

वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा सय्यद मुश्ताक अली चषकाचे आयोजन करण्यात आले. तेव्हा बिहारमधून दोन संघ पाठवण्यात आले होते. बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तिवारी आणि सचिव संजय कुमार यांनी आपापल्या संघांची घोषणा केली. त्यानंतर बराच गदारोळ झाला. त्याचवेळी आदित्य वर्माच्या वतीने बीसीसीआयकडे बिहार क्रिकेटसाठी ऑब्झर्व्हर पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर बीसीसीआयने कोणतीही कारवाई केली नाही. मात्र आता येत्या हंगामापूर्वी बीसीसीआयने याबाबत एक पाऊल उचलले आहे.

बिहार क्रिकेट असोसिएशनला नुकतीच मान्यता मिळाली असून, त्यांचा संघ प्रदीर्घ काळानंतर पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसला. यापूर्वी भांडण आणि भ्रष्टाचारामुळे राज्यात क्रिकेटची दुरवस्था झाली होती. बिहारपासून वेगळे झालेले झारखंड क्रिकेटच्या बाबतीत खूप पुढे गेले होते. तेथून एमएस धोनी, सौरभ तिवारी, इशान किशन यांच्यासह अनेक क्रिकेटपटू देशासाठी खेळले आहेत आणि आंतरराष्ट्रीय सामनेही रांचीमध्ये झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---