---Advertisement---

बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय! केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

On: मंगळवार, जून 2, 2026 6:24 PM
---Advertisement---

भारतीय संघ 6 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI ) एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, माजी भारतीय फिरकीपटू साईराज बहुतुले यांची टीम इंडियाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक (Spin Bowling Coach) म्हणून नियुक्ती केली आहे. न्यू चंदीगडमध्ये होणाऱ्या या कसोटी सामन्यापासून ते आपल्या नवीन जबाबदारीला सुरुवात करतील.

53 वर्षीय बहुतुले हे कसोटी सामन्यासोबतच वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्येही भारतीय फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहेत. साईराज बहुतुले यांनी यापूर्वी आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्यांनी केरळ आणि बंगाल यांसारख्या स्थानिक संघांसोबतही काम केले आहे. 2018 ते 2021 दरम्यान ते राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफचा भाग होते, त्यानंतर ते नॅशनल क्रिकेट अकादमीशी (NCA) जोडले गेले. राहुल द्रविड (Rahul Dravid) जेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते, तेव्हा बहुतुले यांनी ‘इंडिया-ए’ आणि काही आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले होते. 2025 च्या आयपीएल हंगामात ते पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सशी जोडले गेले होते.

साईराज बहुतुले यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर मर्यादित राहिले. 1997 ते 2003 या काळात त्यांनी भारतासाठी केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने (2 कसोटी आणि 8 वनडे) खेळले. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी होती. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 188 प्रथम श्रेणी सामन्यांत 630 विकेट्स आणि 143 लिस्ट-ए सामन्यांत 197 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघात आतापर्यंत स्वतंत्र फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक नव्हता. आता बहुतुले हे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. सध्याच्या कोचिंग स्टाफमध्ये सितांशु कोटक (फलंदाजी), मोर्ने मोर्कल (वेगवान गोलंदाजी), टी. दिलीप (फिल्डिंग) आणि रयान टेन डोशेट (सहाय्यक कोच) यांचा समावेश आहे. 6 जून रोजी न्यू चंदीगड येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना रंगणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC 2025-27) गुणतालिकेत भारतीय संघ सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. या चक्रात भारताने आतापर्यंत 4 सामने जिंकले, 4 गमावले आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे. भारताला घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मागील तीन कसोटी मालिकांपैकी दोन मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. साईराज बहुतुले यांच्या या नियुक्तीमुळे भारतीय फिरकीपटूंना अनुभवाचा फायदा होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---