भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना अत्यंत रोमांचक झाला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या सांघिक कामगिरी करत भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला 52 षटकांत फक्त 120 धावांत गुंडाळले आणि 151 धावांनी विजय मिळवला. दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंसह दर्शकांनीही भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय संघानेही इंग्लंडच्या सर्व प्रकारच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर दिले आहे.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या सलामीवीर केएल राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या दरम्यान राहुलनेही खुलेपणाने स्लेजिंगबद्दल आपले मत मांडले आहे. राहुल म्हणाला की, जर कुणी आमच्या संघातील कोणत्याही एका खेळाडूला लक्ष्य केले; तर आम्ही 11 खेळाडू त्यास एकत्रितपणे उत्तर देऊ.
राहुल म्हणाला, “आमच्या संघात खूप एकी आहे. त्यामुळे जर कोणी आमच्या खेळाडूंपैकी एकालाही डिवचले तर याचा अर्थ असा की त्याने संपूर्ण संघाला डिवचले आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास मागे हटणार नाही. आमच्या गोलंदाजांनी इंग्लंड संघाला धडा शिकवण्याची पूर्ण तयारी केली होती आणि आम्ही सर्वांनी आमची पूर्ण ताकद मैदानावर वापरायचे ठरवले होते. या विजयासाठी आम्ही खूप उत्साही आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होतो.”
सामन्याच्या शेवटच्या दिवशी बुमराह आणि शमी फलंदाजीसाठी मैदानावर आले होते तेव्हा संघ अतिशय बिकट परिस्थितीत होता. पण या जोडीने नवव्या विकेटसाठी 89 धावांची अभेद्य भागीदारी केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी नाकी नऊ आणले होते. त्यावेळी विकेट मिळत नसल्याचे पाहून यजमान संघाच्या गोलंदाजांनी भारतीय खेळाडूंना स्लेजिंग करण्यास सुरुवात केली होती.
वुड, अँडरसन आणि रॉबिन्सनसारख्या गोलंदाजांनी शमी आणि बुमराहला बाऊन्सर मारण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, वुडचा एक चेंडू बुमराहच्या हेल्मेटला लागला होता. त्यानंतर बटलर आणि रूट त्याच्याशी वादही घालताना दिसले होते. तरीही भारतीय खेळाडूंनी हार मानली नाही आणि मैदानावर चौकार आणि षटकार मारत राहिले. इंग्लंड संघाने बुमराहसोबत केलेल्या या कृतीमुळे विराट आणि संपूर्ण भारतीय संघाला खूप राग आला आणि जेव्हा दुसरा डाव सुरू झाला तेव्हा भारतीय संघाने इंग्लंडच्या फलंदाजांना एक एक करत तंबूचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी इंग्लंडच्या चाहत्यांनी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या शतकवीर राहुलच्या अंगावर शॅम्पेन कॉर्कचा मारा केला होता. त्यांच्या या लज्जास्पद वागणूकीलाही भारतीय संघाने थरारक विजय मिळवत सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नेहमी शांत राहणाऱ्या रहाणेचे ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर, केली ‘ही’ भन्नाट पोस्ट; तुम्हीही पाहा
पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, लॉर्ड्स कसोटीत ५ विकेट्स घेणारा इंग्लंडचा ‘हा’ गोलंदाज संघाबाहेर?
‘रनमशीन’ कोहलीच्या धावांच्या दुष्काळामागे ‘हे’ आहे खरे कारण- सचिन तेंडुलकर






