कोरोना महामारीमुळे तब्बल ११७ दिवस बंद असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट ८ जुलैपासून सुरु झाले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान रोज बाऊल स्टेडियमवर सुरू झालेल्या कसोटी मालिकेमुळे, चाहत्यांना एका मोठ्या काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पहायला मिळत आहे. या ऐतिहासिक मालिकेच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा प्रभारी कर्णधार बेन स्टोक्स याने नवीन विक्रम करत दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळविला.
वेस्टइंडीजच्या अल्झारी जोसेफला बाद करत बेन स्टोक्सने आपला १५० वा कसोटी बळी मिळवला याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० धावा व १५० बळी मिळविणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. तो असा कारनामा करणारा एकूण सहावा क्रिकेटपटू ठरला आहे.
अशा प्रकारचा विक्रम करणारे पहिले खेळाडू वेस्टइंडीजचे महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स हे होते. सोबर्स यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत ८०३२ धावावा व २३५ बळी मिळविले आहेत. इंग्लंडचे सर इयान बॉथम ५२०० धावा आणि ३८३ बळी घेत अशा प्रकारची कामगिरी करणारे पहिले इंग्लिश खेळाडू ठरले होते.
भारतातर्फे या यादीत १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांचे नाव आहे. कपिल देव यांनी ५२४८ धावा बनवत अष्टपैलू खेळाडूंत सर्वाधिक ४३४ बळी मिळवले आहेत. द. आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याने १३,२८९ धावा करत २९२ बळी आपल्या नावे केले आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल विटोरी याचा सुद्धा या यादीमध्ये समावेश होतो. विटोरीने ४५३१ धावा फटकावत ३६२ बळी आपल्या फिरकीच्या जोरावर घेतले आहेत.
आता, स्टोक्सच्या नावे अवघ्या ६४ कसोटी सामन्यात ४०९९ धावा आहेत आणि १५० बळीही त्याने पूर्ण केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
गांगुली म्हणतो; मला धोनीकडून अशी अपेक्षा नव्हती, त्यादिवशी तो वेगळाच वागला
चाहत्यांनी दादाचा वाढदिवस केला खास अंदाजात साजरा; पाहून व्हाल थक्क
कोरोनाचा फटका बसणार या ३ क्रिकेटरला, कमबॅक राहणार केवळ एक स्वप्न