न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने इतिहास रचला आहे. स्टोक्सने या सामन्यातील पहिल्या डावात १८ धावांची छोटेखानी खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने एक खणखणीत षटकार मारत आपले कसोटी क्रिकेटमधील १०० षटकार पूर्ण केले. यासह त्याने कोणालाही न जमलेला एकमेवाद्वितीय असा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
न्यूझीलंडच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून कर्णधार स्टोक्सला (Ben Stokes) केवळ १८ धावा करता आल्या. १३ चेंडू खेळताना १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. आपल्या या छोटेखानी खेळीदरम्यान एक षटकार मारत त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले १०० षटकार (Hundred Sixes In Test) पूर्ण केले आहेत.
यासह स्टोक्स कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १०० षटकार आणि १०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू बनला आहे. यापूर्वी कोणत्याही क्रिकेटपटूला हा विलक्षण पराक्रम करता आला नव्हता. स्टोक्सने ८२ सामन्यातील १५१ डावांमध्ये फलंदाजी करताना १०० षटकार पूर्ण केले आहेत. तर १३० डावांमध्ये गोलंदाजी करताना १७७ विकेट्स घेतल्या आहेत.
याचबरोबर तो कसोटी क्रिकेटमध्ये ५ हजारपेक्षा जास्त धावा, १५० पेक्षा जास्त विकेट्स आणि १०० षटकार मारणाराही जगातील पहिलाच क्रिकेटपटू बनला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५२५५ धावा केल्या आहेत.
मोडला इंग्लंडच्या प्रशिक्षकाचाच विक्रम
याखेरीज स्टोक्स कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शंभर षटकार पूर्ण करणारा दुसरा फलंदाजही बनला आहे. याबाबतीत त्याने ब्रेंडन मॅक्यूलमला मागे सोडले आहे. मॅक्यूलमने १७० डावांमध्ये कसोटीतील शंभर षटकार पूर्ण केले होते. मॅक्यूलम सध्या इंग्लंड संघाचा प्रशिक्षक आहे. मात्र स्टोक्सने यासाठी केवळ १५१ डाव घेतले आहेत. असे असले तरीही, या यादीत गिलख्रिस्ट प्रथम स्थानी असून त्याने १३० डावांमध्ये हा पराक्रम केला होता.
शंभर षटकार पूर्ण करण्यासाठी लागलेले सर्वात डाव
१३०- ऍडम गिलख्रिस्ट
१५१- बेन स्टोक्स
१७०- ब्रेंडन मॅक्कूलम
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘जडेजा टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाचा दावा
रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…