वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड संघाने ३ विकेट्स गमावत ३६९ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये इंग्लंडचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने खास कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा २३ वा फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies vs England) नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इंग्लंडकडून फलंदाजी करताना झॅक क्राऊले ३.१ षटकातच शून्य धावेवर तंबूत परतला. त्यापाठोपाठ ऍलेक्स हेल्सने ३० धावा केल्या आणि तोही संघाची धावसंख्या ८० असताना बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या डॅनियल लॉरेन्सने कर्णधार जो रूटला साथ देत संघाची धावसंख्या २०० पार केली. त्याने जो रूटसोबत १६४ धावांची भागीदारी रचली. यावेळी रूटने ६९, तर लॉरेन्सने ९१ धावा केल्या. मात्र, पुढे तो संघाची धावसंख्या २४४ असताना बाद झाला.
त्यानंतर पाचव्या क्रमांकावर बेन स्टोक्स (Ben Stokes) फलंदाजीला आला. त्याने फटकेबाजी करत ७३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत त्याने ४ षटकार आणि ११ चौकार ठोकत ८९ धावा कुटल्या आहेत. यासोबतच त्याने इंग्लंडकडून खेळताना ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो इंग्लंडचा २३ वा फलंदाज ठरला आहे.
‘या’ विक्रमात रोहितला पछाडलं
याव्यतिरिक्त त्याने पदार्पण केल्यापासून कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टोक्सच अव्वलस्थानी आहे. त्याने याबाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही (Rohit Sharma) मागे टाकले आहे. स्टोक्सने आतापर्यंत ८७ षटकार ठोकले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा असून त्याने ६० षटकार ठोकले आहेत. तसेच, ५५ षटकारांसह श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज तिसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा असून त्याने ५४ षटकार ठोकले आहेत.
स्टोक्सने पदार्पण केल्यापासून कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
८७* षटकार- बेन स्टोक्स
६० षटकार- रोहित शर्मा
५५ षटकार- अँजेलो मॅथ्यूज
५४ षटकार- रवींद्र जडेजा






