आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी जगभरातील एकूण 1,574 खेळाडूंनी आपली नावं नोंदवली आहेत. यात इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, तो जवळपास 10 वर्षांपासून टी20 क्रिकेट खेळलेला नाही. मात्र या यादीत इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचं नाव नाही. स्टोक्सला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळण्याचा अनुभव आहे. आता मेगा लिलावासाठी नोंदणी न केल्याचा परिणाम म्हणजे बेन स्टोक्स 2027 सालापर्यंत आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.
वास्तविक, बीसीसीआयनं नवा नियम जारी केला आहे. हा नियम मेगा लिलावापूर्वीच लागू करण्यात आला होता. याअंतर्गत विदेशी खेळाडूंना मेगा लिलावासाठी नोंदणी करावी लागणार आहे. जर त्या खेळाडूनं त्याचं नाव नोंदवलं नाही, तर तो पुढील वर्षी होणाऱ्या मिनी लिलावात सहभागी होऊ शकणार नाही. याचाच अर्थ बेन स्टोक्स केवळ आयपीएल 2025 मेगा लिलावालाच मुकणार नाही, तर तो आयपीएल 2026 च्या मिनी लिलावातही आपली नाव नोंदवू शकणार नाही.
याशिवाय मेगा लिलावापूर्वी आणखी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे, ज्यानुसार लिलावात निवड झाल्यानंतर एखाद्या खेळाडूनं हंगाम सुरू होण्यापूर्वी काही कारणास्तव माघार घेतली, तर अशा परिस्थितीत त्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली जाईल. आता 2025 च्या मेगा लिलावात आपलं नाव न दिल्यामुळे स्टोक्स इंडियन आयपीएल 2025 आणि 2026 हंगामात खेळू शकणार नाही. जर 2027 च्या लिलावात एखाद्या संघानं त्याला खरेदी केलं, तरच तो आयपीएलमध्ये खेळू शकतो. स्टोक्सच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानं आतापर्यंत 43 सामन्यात 920 धावा केल्या असून 28 विकेट्सही घेतल्या आहेत.
हेही वाचा –
क्रिकेट झाला ग्लोबल! या युरोपीयन देशाच्या खेळाडूनं प्रथमच केली आयपीएल मेगा लिलावासाठी नोंदणी
विराट-बाबर आणि रोहित-रिजवान एकाच संघात खेळणार! 20 वर्षांनंतर या स्पर्धेचं पुनरागमन?
आयसीसी क्रमवारीत रिषभ पंतची धमाल, रोहित-कोहली टॉप 20 मधून बाहेर!