पाकिस्तान क्रिकेटच्या नव्या हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर आता पाकिस्तान संघ कसोटीत विश्वविजेत्या इंग्लंड संघाचे यजमानपद भूषवेल. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ पाकिस्तान येथे पोहोचला. पाकिस्तानमध्ये आगमन झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने आपण या मालिकेसाठी खूप उत्साहीत असल्याचे म्हटले.
पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला,
“या मालिकेसाठी आम्ही खूप उत्साही आहोत. मागील हंगाम आमच्यासाठी जबरदस्त गेला. एक संघ म्हणून आम्ही या सर्व गोष्टी जाणतो. उपखंडात मिळणाऱ्या आव्हानासाठी आम्ही सज्ज आहोत. सध्या तरी आमच्याकडे सगळे काही आहे. नेट बॉलरपासून आमचा स्वतःचा संघदेखील सुसज्ज आहे. केवळ सामन्यावेळी खेळपट्टी कशी मिळेल हे आम्हाला माहीत नाही.”
इंग्लंड संघ प्रथमच स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंड बाहेर खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघ कसा कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
उभय संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असलेल्या या मालिकेतील पहिला सामना 1 ते 5 डिसेंबर दरम्यान रावळपिंडी येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत मुलतान येथे होईल. तर, अखेरचा सामना 17 ते 21 डिसेंबर यादरम्यान कराची येथे खेळला जाईल.
पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ-
बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, जो रूट, जेम्स अँडरसन, हॅरी ब्रूक, झॅक क्राऊली, बेन डकेट, विल जॅक्स, कीटन जेनिंग्स, जॅक लीच, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, मार्क वुड.
(ben Stokes first reaction after reaching Pakistan)