इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने मागच्या काही दिवसांपूर्वी मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर तो काही दिवसांपूर्वी भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मायदेशातील कसोटी मालिकेतही सहभागी झाला नव्हता. मात्र, आता त्याने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. स्टोक्सने चाहत्यांना क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. स्टोक्सने त्याच्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीवर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तो दुखापतीतून सावरत असल्याचे समोर येतेय.
शेअर केला फोटो
स्टोक्सने क्रिकटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतल्यामुळे त्याला काही दिवसांवर आलेल्या टी२० विश्वचषक आणि ऍशेस मालिकेसाठी संघात निवडले गेले नाही. अशातच स्टोक्सने पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. स्टोक्सने त्याच्या ट्वीटर खात्यावरून एक फोटो शेअर करून हे संकेत दिले आहेत. या फोटोत स्टोक्सचा चेहरा दिसत नाहीये. मात्र, त्याचे दोन्ही हात मात्र दिसत आहेत. त्याने त्याच्या हाता क्रिकेट बॅट पकडलेली आहे आणि त्याच्या डाव्या हाताच्या एका बोटावर पट्टी बांधलेले दिसतेय. त्याने या पोस्टमधून जवळपास सहा महिन्यांनी बॅट हातात घेतल्याची सांगितले आहे. स्टोक्सने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘१२ एप्रिलला बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर आता ११ ऑक्टोबरला पहिल्यांदा हातात बॅट ठीकपणे पकडू शकत आहे.’
Ohhh aye lad pic.twitter.com/Q4lDN6HOpD
— Ben Stokes (@benstokes38) October 11, 2021
आयपीएल-विश्वचषकातून घेतलेली माघार
स्टोक्स क्रिकेटमधून विश्रांती घेण्यापूर्वी आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात खेळला होता. त्याला त्यावेळी राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. एप्रिलमध्ये त्याच्या बोटावर पहिली शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर नुकतीच त्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली. स्टोक्सने क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यामुळे तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही सहभागी होऊ शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितत त्याचा संघ राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. असे असले तरी, स्टोक्सने शेअर केलेल्या या फोटोनंतर तो लवकरच क्रिकेटमध्ये वापसी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि काहींनी तर टी२० विश्वचषकात वापसी करण्यासाठी आवाहनही केले आहे.