मुंबई । गतवर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला नव्हता असे वादग्रस्त विधान इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने केले होते. यासोबत त्याने कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या फलंदाजीवरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्टोक्स म्हणाला, पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर करण्यासाठी भारत इंग्लंडविरुद्ध जाणूनबुजून हरला. या विधानानंतर बेन स्टोक्सवर चौफेर टीका सुरु झाली. त्यानंतर त्याने आपले विधान पलटले. माझ्या विधानाचा जाणून बुजून विपर्यास केला गेल्याचा आरोप बेन स्टोक्सने केला. स्टोक्सच्या या विधानानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर भक्त यांनी एक जुना व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओ मध्ये स्टोक्स, भारत पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी जाणूनबुजून हरला असे विधान केल्याचे दिसून येते.
Ben Stokes writes in his book that India lost to England deliberately to remove Pakistan from world Cup 19 and we predicted it Pakistan India relationship @TheRealPCB @TheRealPCBMedia pic.twitter.com/ioqFSHeeg1
— Sikander Bakht (@Sikanderbakhts) May 28, 2020
स्टोक्स म्हणाला, धोनी फलंदाजीस आला होता तेव्हा भारताला ११ षटकात ११२ धावांची गरज होती. त्याची फलंदाजी आश्चर्यचकित करणारी होती. चौकार-षटकारांची आतषबाजी करण्याऐवजी तो एकेरी धावा घेण्यावर भर देत होता. भारतीय संघ शेवटच्या बारा चेंडूत विजय मिळू शकला असता. धोनी आणि केदार जाधव यांची भागीदारी भारताला विजय मिळवून देईल असे बिलकुल वाटत नव्हते. जर का त्यांनी आक्रमक फलंदाजी केली असती तर भारतीय संघ नक्की जिंकला असता.
विश्वचषकात बर्मिंघम येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३३७ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव झाला.