प्रो कबड्डीमध्ये काल एकतर्फी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगाल वॉरियर्स संघाने यु.पी. योद्धा संघाचा ४०-२० असा पराभव केला. या सामन्यात बेंगाल वॉरियस संघाकडून सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली तर यु.पी.योद्धासंघाला सामन्यात लय गवसली नाही.
मागील सर्व मोसमांमध्ये डिफेन्ससाठी मजबूत मानल्या जाणाऱ्या बेंगाल संघाने या मोसमामध्ये चांगल्या रेडर्सचा संघातही समावेश केला आहे. पहिल्या सत्रात बेंगाल वॉरियर्सच्या रेडर्सच्या ताफ्याने यु.पी.योद्धा संघाला चांगलेच धक्के दिले . सत्रातील सातव्या मिनिटाला बंगालच्या जाँग कुन लीच्या सुपर रेडने सामना ११-२ अश्या स्थितीत आणला आणि यु.पी संघाला ऑल आऊट केले. यु.पी.योद्धाचा कर्णधार नीतीन तोमर काही कमाल करू शकला नाही. विनोद कुमार आणि मनिंदर या अन्य दोन बंगालच्या रेडरने उत्तम कामगिरी करत पुन्हा ऑल आऊट केले. पहिले सत्र संपले त्या वेळी सामना २२-८ असा बंगालच्या बाजूने झुकला होता.
दुसरे सत्रही बंगालच्या नावावर राहिले. सामन्यात संयमी खेळ करत फक्त डु ऑर डाय रेडमध्ये गुण मिळवून सामना जिंकण्याचे ठरवून आत आलेल्या बेंगाल संघाला यु.पीच्या डिफेन्सकडून जास्त प्रतिकार सहन करावा लागला नाही आणि ते गुण मिळवत गेले. दुसऱ्या सत्रात १०व्या मिनिटाला यु.पी.चा संघ पुन्हा ऑल आऊट झाला आणि या सामन्यात बेंगाल संघाने ३४-१२ अशी आघाडी घेतली. यु.पी.चा रिशांक देवडीका या सामन्यात खेळत नसल्याने रेडींगची सारी जबाबदारी नितीन तोमरवर आली होती पण ९३ लाख रुपये किमतीचा हा खेळाडू पूर्ण सामन्यात फक्त १ गुण मिळवू शकला. दुसरे सत्र संपले तेव्हा हा सामना बेंगाल वॉरियर्सने ४०-२० आसा सहज जिंकला.
शनिवारी झालेल्या बेंगलुरू विरुद्धच्या सामन्यात यु.पी. संघाने केलेला खेळ पाहता हा सामना यु.पी.संघ आरामात जिंकेल असे वाटत होते पण बेंगाल वॉरियर्सने उत्तम सांघिक खेळ करत हा सामना जिंकला. दोन सामन्यात दोन विजयामुळे १० गुण मिळवत बेंगालचा संघ ‘झोन बी’ तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.