कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या पहिल्या महाराजा टी२० ट्रॉफीचा क्वालिफायर सामना मंगळवारी (२३ ऑगस्ट) खेळला गेला. धावांचा अक्षरशः पाऊस पडलेल्या या सामन्यात मयंक अगरवालच्या नेतृत्वातील बेंगलोर ब्लास्टर्सने मनीष पांडेच्या नेतृत्वातील गुलबर्गा मिस्टिक्सचा ४४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार मयंक अगरवाल सामन्याचा मानकरी ठरला.
चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात गुलबर्गा संघाचा कर्णधार मनिष पांडेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय भलताच उलटा पडला. यापूर्वीच स्पर्धेत प्रत्येकी शतक ठोकलेली बेंगलोर संघाचे सलामी जोडी मयंक अगरवाल व चेथन यांनी संघाला जबरदस्त सुरुवात दिली. १५.५ षटकात त्यांनी १६२ धावा जोडल्या. चेथन ४८ चेंडूवर ८० धावा चोपून बाद झाला. त्यानंतर मयंकने स्पर्धेतील आपले दुसरे शतक पूर्ण केले. अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने ६१ चेंडूवर ११२ धावांची खेळी केली. बेंगलोर संघाने निर्धारित २० षटकात ३ बाद २२७ अशा मोठ्या धावा रचल्या.
बेंगलोर संघाने दिलेल्या भल्या मोठ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुलबर्गा संघाकडून एकही मोठी भागीदारी झाली नाही. यापूर्वी शतक ठोकलेला २० वर्षीय सलामीवीर रोहन पाटील याने एकाकी झुंज दिली. त्याने ४९ चेंडूवर १०८ धावांची खेळी केली. परंतु इतर कोणीही त्याला साथ न देऊ शकल्याने गुलबर्गा संघाचा डाव १८३ धावांत आटोपला. मयंक अगरवाल याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुलबर्गा संघ करून नायरच्या म्हैसूर वॉरियर्सचा सामना करेल. त्यांनी एलिमिनेटरमध्ये हुबळी टायगर्सचा पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण