गोवा दिनांक २६ जानेवारी – सुनील छेत्रीचा मनाचा मोठेपणा अन् उदांता सिंगचा उल्लेखनीय खेळ बंगलोर एफसी विरुद्ध चेन्नईयन एफसी यांच्यातल्या आजच्या इंडियन सुपर लीगमधील ( आयएसएल) सामन्यात पाहायला मिळाला. अनुभवी छेत्रीला आज दोन गोल करून आयएसएलमध्ये ५० गोल्सचा टप्पा गाठता आला असता, परंतु त्यानं दोन्ही संधी युवा खेळाडूंना दिल्या. छेत्रीनं १२व्या मिनिटाला पेनल्टी इमान बसाफा याला घ्यायला दिली, त्यानंतर ४२व्या मिनिटाला उदांतासाठी गोलसंधी आणून दिली. उदांतानं या सामन्यातील दुसरा गोल ५२व्या मिनिटाला करताना बंगलोर एफसीचा ३-० अशा विजय निश्चित केला. बंगलोरचे बचावपटू अन् गोलरक्षक लारा शर्मा यांनीही उल्लेखनीय योगदान दिले.
सुनील छेत्रीच्या गोलमुळे बंगलोर एफसीनं मागील सामन्यात पराभव टाळला. पण, चेन्नईयन एफसीविरुद्ध त्यांची खरी कसोटी लागली. छेत्रीचा फॉर्म परतणे संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरले. चौथ्या मिनिटाला बंगलोरकडून पहिलं आक्रमण झालं. ब्रूनो सिल्व्हानं बॉक्सबाहेरून दिलेला क्रॉस इमान बसाफानं अचून हेरला अन् त्यानं ऑन टार्गेट शॉट मारला. चेन्नईयनचा गोलरक्षक देबजित मजूमदार यानं सुरेख रित्या तो अडवला. यानंतर चेन्नईयनकडून प्रतीहल्ला झाला आणि ९व्या मिनिटाला पराग श्रीवासनं पेनल्टी बॉक्समध्येच घोळ घातला अन् चेंडू चेन्नईयनच्या लुकास गिकिएविचकडे गेला. त्याला इतक्या जवळून चेंडूला दिशाच दाखवायची होती, परंतु बंगलोरचा गोलरक्षक लारा शर्मानं तो अडवला. चेंडू गोलजाळीच्या वरच्या खांब्याला लागून माघारी फिरला. १२ व्या मिनिटाला बंगलोरनं गोलखातं उघडलं. छेत्रीला पेनल्टी बॉक्समध्ये पाडल्यामुळे पंचांनी बंगलोरला पेनल्टी दिली. त्यावर इमान बसाफानं गोल केला.
चेन्नईयनकडून वारंवार गोल करण्याचे प्रयत्न झाले, पण त्यांच्यात अंतिम पास करण्यात ताळमेळचा अभाव प्रकर्षाने जाणवला. २४व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेल्या पासवर गिकिएविचनं हेडरद्वारे केलेला प्रयत्न गोलपोस्टवरून गेला. ३४व्या मिनिटाला व्लॅदिमिर कोमननं गमावलेल्या संधीमुळे चेन्नईयनला बरोबरीचा गोल करण्यात पुन्हा अपयश आलं. चेन्नईनच्या बचावफळीच्या चुकांचा बंगलोरला फायदा झाला. ४२व्या मिनिटाला उदांता सिंग आणि सुनील छेत्री यांच्यात सुरेख ताळमेळ पाहायला मिळाला. उदांता सिंगनं मध्यरेषेपासून चेंडू चेन्नईयनच्या खेळाडूंना चकवत पेनल्टी बॉक्सपर्यंत घेऊन गेला. छेत्री लगेच तिथे धावून आला अन् उदांतानं पास केला. छेत्रीनं पेनल्टी क्षेत्रात चेन्नईयनच्या चार बचावपटूंना चकवले. पण, त्यानं गोल करण्याची संधी उदांताला दिली आणि बंगलोरनं पहिल्या हाफमध्ये २-० अशी मजबूत आघाडी घेतली.
मध्यंतरानंतरही चेन्नईयनच्या बचावफळीतील चुका कायम दिसल्या अन् ५२व्या मिनिटाला अशीच एक चूक बंगलोरच्या पथ्यावर पडली. मोहम्मद साजीद पेनल्टी बॉक्समध्ये चेंडूवर ताबा राखू शकला नाही आणि उदांतानं सामन्याती वैयक्तिक दुसरा गोल करून बंगलोरची आघाडी ३-० अशी मजबूत केली. ६२व्या मिनिटाला कोमनच्या जागी नेरिजस वलस्किस याला मैदानावर उतरवल्यानंतर चेन्नईयनच्या खेळात वेगळीच गती आली. त्यांच्याकडून वारंवार गोल करण्याचे प्रयत्न होताना दिसले. पण, तोंडाशी आलेला घास बंगलोरचे बचावपटू त्यांच्याकडून चतुराईनं हिरावून घेत होते. चेन्नईनच्या आक्रणात कौशल्याची कमतरता दिसली आणि त्यामुळे त्यांची गोल पाटी कोरीच राहिली. या विजयानंतर बंगलोर संघ सहाव्या क्रमांकावर सरकला आहे.
निकाल – बंगलोर एफसी ३ ( इमान बसाफा १२ मि., उदांता सिंग ४२ मि. व ५२ मि. ) विजयी विरूद्ध चेन्नईयन एफसी ०