गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सोमवारी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर बेंगळुरू एफसीची जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होईल. अखेरच्या क्षणापर्यंत ही लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.
दुसऱ्या सत्रात बेंगळुरूने केलेले गोल संयुक्तरित्या सर्वाधिक आहेत, तर या सत्रात पत्कराव्या लागलेल्या गोलच्या बाबतीत जमशेदपूर कमकुवत संघ ठरला आहे. त्यामुळे ही लढत उत्कंठावर्धक ठरेल.
जमशेदपूरला 66.67 टक्के गोल दुसऱ्या सत्रात पत्करावे लागले आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त गोल केवळ केरला ब्लास्टर्स (8) आणि एससी ईस्ट बंगाल (11) यांना पत्करावे लागले आहेत. याशिवाय नऊ पैकी चार गोल अखेरच्या 15 मिनिटांत झाले आहेत. हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे ओवेन कॉयल यांच्या संघाच्या या कमकुवत दुव्याचा फायदा उठवण्यासाठी बेंगळुरू प्रयत्न करेल.
बेंगळुरूचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असला तरी ते सातत्यासाठी झगडत असल्याचे उघडपणे दिसते आहे. एटीके मोहन बागानविरुद्ध ते 0-1 असे हरले. तो स्पर्धेतील त्यांचा पहिलाच पराभव ठरला. यावरून बेंगळुरूला हरवता येते हे स्पष्ट झाले.
दुसरीकडे जमशेदपूरला एफसी गोवा संघाविरुद्ध गुणांना मुकावे लागले. आधी त्यांचा महत्त्वपूर्ण गोल नाकारण्यात आला. त्यानंतर इगोर अँग्युलोने अखेरच्या क्षणी केलेला गोल निर्णायक ठरला.
जमशेदपूरचा संघ जास्त गुणांच्या योग्यतेचा असल्याचे बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी मान्य केले. त्याचवेळी डिवचला गेलेला आणि विजयासाठी आतूर असलेला जमशेदपूर संघ उसळी घेऊन झुंजार खेळ करेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
कुआद्रात यांनी सांगितले की, जमशेदपूरचा संघ खरोखरच चांगला सराव करीत आहे. त्यांच्या खात्यात जास्त गुण असायला हवे होते. आम्हाला त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यांचे परदेशी खेळाडू आठवड्यागणिक कामगिरी उंचावत आहेत. त्यांचे तरुण भारतीय खेळाडू सुद्धा चांगला खेळ करीत आहेत. हा संघ खडतर प्रतिस्पर्धी असेल, पण आमच्याकडे योजना आहे आणि आम्ही तीन गुण मिळवण्याचा प्रयत्न करू.
गोल करणे ही बेंगळुरूसाठी कधीच समस्या नव्हती, पण त्यांचा बचाव सर्वोत्तम झालेला नाही. पहिल्या सात सामन्यांत त्यांना आठ गोल पत्करावे लागले आहेत. 2019-20च्या मोसमात त्यांना साखळीत केवळ 13 गोल पत्करावे लागले होते.
जमशेदपूरची मदार नेरीयूस वॅल्सकीस याच्यावर असेल. तो प्रतिस्पर्ध्याच्या बचाव फळीसमोर आव्हान निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. त्याने आतापर्यंत सहा गोल केले आहेत. लिथुएनियाच्या या स्ट्रायकरला बेंगळुरूविरुद्ध गोल करून दाखवायचा आहे. कुआद्रात यांनी सांगितले की, आम्ही योजना आखली आहे. आमच्या संघाचे स्वरुप चांगले आहे. मागील मोसमात आम्ही सर्वांत कमी गोल पत्करले. आम्ही बचाव फळीतील खेळाडूंना आगेकूच करण्यासाठी प्रोत्साहन देतो. तशी आमची शैली आहे, जी आमच्या डावपेचांचा एक भाग आहे. वॅल्सकीस गेल्या मोसमात आमच्याविरुद्ध गोल करू शकला नव्हता. त्यादृष्टिने पुढील सामन्यात योग्य गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
आगामी सामन्याबाबत कॉयल आशावादी आहेत. आघाडी फळीत वॅल्सकीस याच्या जोडीला ऐतोर मॉनरॉय याचा खेळ महत्त्वाचा असेल. त्याने जमशेदपूरतर्फे सर्वाधिक संधी निर्माण केल्या आहेत. कॉयल यांनी सांगितले की, हा सामना दोन्ही संघांसाठी अवघड असेल. बेंगळुरू संघाविषयी बराच आदर बाळगला जातो. त्यांचे प्रशिक्षक विलक्षण आहेत आणि खेळाडू फार चांगले आहेत. ते फार कसून सराव करतात आणि संघटित राहतात. सर्वोत्तम संघ आणि सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्यास आम्ही आतूर आहोत. सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जिंकण्याची क्षमता आमच्याकडे आहे, पण एका चांगल्या संघाविरुद्ध आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०: हैदराबादला हरवून ब्लास्टर्सचा पहिलाच विजय
आयएसएल २०२०: ईस्ट बंगाल अन् चेन्नईयन संघातील सामन्यात थरारक बरोबरी
आयएसएल २०२०: चेन्नईयनला नमवत पहिल्या विजयाचा ईस्ट बंगालचा निर्धार