MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा तिसरा हंगाम 4 जून रोजी सुरू होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच 20 दिवसांची ही स्पर्धा रंगेल. एका दिवशी तीन-तीन सामन्यांचा थरार आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे. पहिल्या दोन हंगामाप्रमाणेच यावेळी देखील अनेक रोमांचक सामने पाहायला मिळतील. तिसऱ्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी आपण मागील दोन हंगामातील खेळाडूंची व संघांची कामगिरी माहित करून घेत आहोत. आज आपण एमपीएल 2024 मध्ये सर्वात चांगला इकॉनोमी रेट राखणाऱ्या गोलंदाजांविषयी (कमीत कमी 12 षटके) जाणून घेऊया.
एमपीएल 2023 मध्ये रत्नागिरी जेट्स संघाचा फिरकीपटू कुणाल थोरात (Kunal Thorat) हा धावा रोखण्यात यशस्वी ठरलेला. दुसऱ्या हंगामात त्याच्या गोलंदाजीला अधिक धार आली. त्याला दुखापतीने फक्त 4 सामन्यात खेळता आले. यामध्ये 14 षटके गोलंदाजी करताना फक्त 6 बळी मिळवले. मात्र, त्याचा इकॉनॉमी रेट हा केवळ 6.14 इतका जबरदस्त राहिला.
रत्नागिरी जेट्स संघाने एमपीएलच्या दोन्ही हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. या दोन्ही वेळी अझीम काझी (Azim Kazi) हाच संघाचे नेतृत्व करत होता. दुसऱ्या हंगामात संघाला गरज असताना प्रत्येक वेळी तो संकटमोचक म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही ठिकाणी उभा राहिला. संपूर्ण हंगामातील बारा सामन्यात केवळ 12 षटके गोलंदाजी करत 6.33 च्या मामुली इकॉनोमी रेटने धावा दिल्या. काझीने या 12 सामन्यात चार बळी आपल्या नावे केले होते.
कुणाल व काझी यांच्याप्रमाणेच रत्नागिरीचा तिसरा फिरकी गोलंदाज योगेश चव्हाण (Yogesh Chavan) हा देखील विरोधी संघांसाठी घातक ठरला. मात्र, उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करणाऱ्या योगेशने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्याने आठ सामन्यात 21 षटके गोलंदाजी करताना 6 बळी टिपलेले. यादरम्यान त्याने 6.57 असा उत्कृष्ट इकॉनॉमी रेट राखलेला.
या तिघांव्यतिरिक्त पुणेरी बाप्पाचा रोशन वाघसरे (6.60) व रत्नागिरीचाच प्रदीप दाढे (6.63) या गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट देखील सात पेक्षा कमी राहिला होता. तर, दहा असे गोलंदाज होते ज्यांचा इकॉनॉमी रेट हा 8 पेक्षा कमी राहिलेला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 2023 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. सलग तिसऱ्या वर्षी क्रिकेटप्रेमींना ही स्पर्धा गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विनामूल्य पाहता येणार आहे. यावर्षी एमसीएने प्रथमच महिलांसाठी WMPL सुरू केले आहे. या दोन्ही स्पर्धांचे थेट प्रक्षेपण OTT वर JioHotstar व टेलिव्हिजनवर Star Sports 2 चॅनेलवर होणार आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)






