2019 वर्ष आज संपत आहे. या वर्षभरात क्रिकेट चाहत्यांना अनेक अफलातून झेल पहायला मिळाले. या वर्षात अनेक खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी करताना एकहाती झेल घेत, तसेच बाऊंड्री लाईनवर झेल घेत सर्वांना आश्चर्यचकित केले.
2019 वर्षातील असेच काही खेळाडूंनी घेतलेले निवडक सर्वोत्तम झेल –
बेन स्टोक्स – विश्वचषक 2019
2019 विश्वचषकात द ओव्हल मैदानावर झालेल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील सामन्यात बेन स्टोक्सने अँडिल फेगलूकवायोचा झेल एका हाताने सुरेख टिपला होता.
दक्षिण आफ्रिका इंग्लंडने दिलेल्या 312 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 35 व्या षटकात स्टोक्सने घेतला. या षटकात इंग्लंडकडून आदील रशीद गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या अँडिल फेगलूकवायोने मिडविकेटला स्विप शॉट मारला.
पण याचवेळी डिप मिडविकेटच्या जवळ असणाऱ्या स्टोक्सने मागच्या बाजूला हवेत उडी मारुन एका हाताने जबरदस्त झेल घेतला. हा झेल पाहुन सर्वच चकित झाले होते. तसेच या झेलबद्दल स्टोक्सचे संघसहकाऱ्यांकडून कौतुकही करण्यात आले.
फ्रॅन विल्सन – इंग्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला, वनडे सामना
13 जूनला इंग्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात चेम्सफोर्ड येथे तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडच्या फ्रॅन विल्सनने वेस्ट इंडिजकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या हॅली मॅथ्यूजचा घेतलेल्या झेलने सर्वांचेच लक्ष वेधले होते.
39 षटकात डकवर्थ लूईस नियमानुसार 267 धावांचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडीजकडून सलामीला उतरलेल्या मॅथ्यूजने केटी क्रॉसने टाकलेल्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कव्हर्सच्या दिशेने फटका मारला.
त्याचवेळी हवेत उडी मारत फ्रॅन विल्सनने दोन्ही हातांनी सुरेख झेल घेतला. तिच्या या झेलचे संघातील सर्वच खेळाडूंनी कौतुक केले होते.
स्टिव्ह स्मिथ – ऍशेस 2019
द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या ऍशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथने इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस वोक्सचा एका हाताने शानदार झेल घेतला.
वोक्स इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 87 व्या षटकात 6 धावांवर फलंदाजी करत असताना मिशेल मार्शने टाकलेल्या चेंडूवर त्याच्या बॅटची कड लागली आणि चेंडू स्लीपच्या दिशेने गेला. त्यामुळे दुसऱ्या स्लीपला थांबलेल्या स्मिथने चपळाईने त्याच्या उजवीकडे उडी मारत एका हाताने शानदार झेल घेतला.
विराट कोहली – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, टी20 सामना
तिरुअनंतपुरम येथे 8 डिसेंबरला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने बाउंड्री लाइन जवळ शिमरॉन हेटमायरच्या घेतलेल्या झेलची बरीच चर्चा झाली.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारताने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताच्या रविंद्र जडेजाने टाकलेल्या 14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हेटमायरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण विराटने लाँगऑनवरुन उजवीकडे पळत येत दोन्ही हात पुढे लांब करत बाउंड्री लाईनजवळ हेटमायरचा झेल घेतला.
हा झेल घेतल्यानंतर विराटचा तोल गेला होता. मात्र त्याने हातातील चेंडू निसटून दिला नाही. तसेच त्याच्या शरिराचा स्पर्श बाउंड्री लाइनला लागणार नाही, याचीही त्याने काळजी घेतली.
हरमनप्रीत कौर – भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडीज महिला, वनडे सामना
अँटिग्वा येथे 1 नोव्हेंबरला भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडीज महिला संघात वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. भारताची स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरने घेतलेल्या एका अफलातून झेलची चांगलीच चर्चा झाली.
तिने प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाच्या स्टॅफॅनी टेलरचा डावाच्या शेवटच्या चेंडूवर एका हाताने झेल घेतला. त्यावेळी स्टॅफॅनी 94 धावांवर खेळत होती. तिला शतक पुर्ण करण्यासाठी केवळ 6 धावांची आवश्यकता होती.
त्यामुळे तीने मोठा फटका मारण्याच्या नादात लाँग – ऑनच्या दिशेने चेंडू मारला. परंतु, हरमनप्रीतने हुशारीने बाउंड्री लाईन जवळ याेग्य वेळी उंच उडी मारून डाव्या हातात चेंडू झेलला आणि टेलरला झेलबाद केले.
Here u go!!
Penultimate ball SIX and then Harmanpreet Stunner in last ball of the innings !!#WIWvINDW pic.twitter.com/nMoZbDPx1N— Merin Kumar (@merin_kumar) November 1, 2019






