भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना अतिशय रोमांचक होत चालला आहे. शुक्रवारपासून (०३ डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव संपुष्टात आला. या डावात ११० षटकांमध्ये सर्व विकेट्स गमावत भारताने ३२५ धावा जमवल्या. भारताच्या या डावात लक्ष वेधले ते न्यूझीलंडच्या फिरकीपटू अजाज पटेल याने. त्याने भारताच्या सर्वच्या सर्व १० फलंदाजांना बाद करत इतिहास तर रचलाच सोबतच अविस्मरणीय कामगिरीही केली आहे.
जन्माने मुंबईकर असलेल्या अजाजसाठी हा सामना खूप खास होता. कारण जन्मभूमी असलेल्या मुंबईत हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात त्याला मुंबईच्या खेळपट्टीकडून भरपूर मदत मिळाली आणि त्याचा फायदा घेत त्याने इतिहासही रचला आहे.
सलामीवीर शुबमन गिल (४४ धावा) त्याची पहिली शिकार ठरला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली अशा अनुभवी शिलेदारांना त्याने शून्यावर तंबूत धाडले. पुढे श्रेयस अय्यर (१८ धावा) त्याचा पहिल्या दिवसातील शेवटचा विकेट ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृद्धिमान साहा (२७ धावा) आणि आर अश्विन (० धावा) यांच्या त्याने एकाच षटकात सलग २ विकेट्स घेतल्या.
भारताच्या आघाडीच्या ६ फलंदाजांना बाद केल्यानंतर त्याचा सर्वात मोठा बळी ठरला, भारताचा दीडशतकवीर मयंक अगरवाल. टॉम ब्लंडलच्या हातून त्याने १५० धावांवर खेळत असलेल्या अजाजला झेलबाद केले. पुढे मैदानावर तळ ठोकलेल्या अष्टपैलू अक्षर पटेललाही त्याने अर्धशतकी खेळी केल्यानंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर रचिन रविंद्रच्या मदतीने खालच्या फळीतील जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांनाही पव्हेलियनला पाठवत त्याने १० विकेट्स पूर्ण केल्या.
यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या बोटावर मोजक्या इतक्या गोलंदाजांच्या यादीत सहभागी झाला आहे. ४७.५ षटके गोलंदाजी करताना ११९ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या आहेत. यासह ज्या देशात जन्म झाला, त्याच देशात, त्याच देशाविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या खास यादीत त्याचा समावेश झाला आहे. या यादीत भारताचे गुलाबभाई रामचंद यांचाही समावेश आहे.
जन्मभूमीत जन्माच्या देशाविरुद्धच सर्वोत्तम कसोटी गोलंदाजी कामगिरी:
१०/११९ – अजाज पटेल न्यूझीलंड विरुद्ध भारत, २०२१*
६/४९ – गुलाबभाई रामचंद भारत विरुद्ध पाकिस्तान, १९५५
६/६३ – अँडी कॅडिक इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, २००२
६/७७ – डेव्हॉन माल्कम इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, १९९०
महत्त्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित आगरकर