मुंबई:- भारत पेट्रोलियमने सलग तिसऱ्या वर्षी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या विशेष व्यावसायिक गटाचे जेतेपद पटकावले. कुमार गटात जेतेपदाचा मान श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने पटकाविला. भारत पेट्रोलियमचा अक्षय सोनी या गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रू.पाच हजार(₹५,०००/-) देऊन गौरविण्यात आले. कुमार गटात श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाचा भावेश महाजन यांनी हा मान पटकाविला. त्याला रोख रू.दोन हजार (₹२,०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले.
दादर(पूर्व)येथील भवानीमाता क्रीडांगणावर झालेल्या विशेष व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियमने बँक ऑफ बडोदाचा ४१-२३असा पराभव करीत सलग तिसऱ्यांदा “स्व. मोहन राजाराम नाईक सुवर्ण पदकावर” आपले नाव कोरले. त्याच बरोबर रोख रू. पंचवीस हजार(₹२५,०००/-) देखील आपल्या नावे केले. उपविजेत्या बँकेला चषक व रोख रू. पंधरा हजार(₹१५,०००/-)वर समाधान मानावे लागले. पूर्वार्धात एक लोण देत २१-१७अशी आघाडी घेणाऱ्या पेट्रोलियमने उत्तरार्धात आणखी २लोण देत सामना एकतर्फी केला. पेट्रोलियमच्या अक्षय सोनी, आकाश रूडले यांनी बँकेचा बचाव खिळखिळा केला. तर अक्षय बेर्डेने उत्तम पकडी करीत आपला बचाव भक्कम केला. बँकेच्या शार्दुल पाटील, उमेश म्हात्रे यांची आज मात्रा चालली नाही. पेट्रोलियमच्या अक्षय बेर्डे स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा, तर बँकेच्या शार्दुल पाटीलला उत्कृष्ट चढाईचा खेळाडू म्हणून रोख रू. दोन हजार पाचशे (₹२,५००/-) देऊन गौरविण्यात आले.
श्रीराम क्रीडा विश्वस्तने विजय क्लबला ४९-२५असे सहज नमवित रोख रू. अकरा हजार (₹११,०००/-) व “स्व. मोहन नाईक चषक” आपल्या नावे केला. उपविजेत्या संघाला चषक व रोख रू. सात हजार (₹७,०००/-) वर समाधान मानावे लागले. पहिल्या सत्रातच ३लोण देत ३२-०६अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या श्रीरामने उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भावेश महाजन याचा झंझावाती अष्टपैलू खेळ त्याला तुषार शिंदेची मिळालेली चढाईची, तर आशिष यादवची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा मोठा विजय शक्य झाला. विजय क्लबच्याअतुल साळवी, रोहन राज यांना दुसऱ्या सत्रात थोडा सूर सापडला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. श्रीरामच्या तुषार शिंदेला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे, तर विजय क्लबच्या अथर्व कांबळेला उत्कृष्ट पकडीचे खेळाडू रोख रू. एक हजार (₹१,०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नामदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
महत्वाच्या बातम्या –
दोशी इंजिनिअर्स करंडकमध्ये डेक्कन जिमखाना, व्हेरॉक, पूना क्लब संघांची विजयी सलामी
वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला जड जातेय श्रीलंका! मागील पाच विश्वचषकात केलीय अक्षरशः दुर्दशा