-आदित्य गुंड ([email protected])
त्याला दहावीला गणितात १०० पैकी १०० मार्क होते. पुढे अकरावीलादेखील १०० आणि बारावीला ९६ पडले. हुशार असूनही शिक्षणात त्याला फारसा रस नव्हता. काहीतरी शिक्षण पाहिजे म्हणून त्याने रात्रीच्या कॉलेजमध्ये बी कॉमला प्रवेश घेतला. मुळातच शिक्षणात रस नसल्याने म्हणा किंवा अजून काही म्हणा, तिन्ही वर्षात मिळून तो फक्त एक दोन दिवस कॉलेजला गेला.
त्यावरून त्याचे आणि मुख्याध्यापकांचे भांडणही झाले. “तुला परीक्षेला बसू देणार नाही” असे सांगितले गेले. त्याचे काका त्याच कॉलेजला उपमुख्याध्यापक होते. त्यांच्या विनंतीमुळे कसेबसे त्याला परीक्षेला बसता आले. ज्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पास होताना तारांबळ होत होती तिथे या पठ्ठ्याने तिन्ही वर्षांना फर्स्ट क्लास मिळवला.
कॉलेजातून फर्स्ट क्लास मिळवणारा तो एकमेव विद्यार्थी होता. हा फर्स्ट क्लास त्याला त्याच्या काकांमुळे मिळाला नव्हता तर त्याने त्यासाठी खरोखर मेहनत केली होती. बी कॉम झाल्यानंतर लगेचच त्याने कॅनरा बँकेत नोकरी पत्करली. त्याला क्रिकेटची आवड होती. कुठलेही प्रशिक्षण नसताना तो उत्तम क्रिकेट खेळत असे. कर्नाटकच्या १९ वर्षाखालील, २१ वर्षाखालील, २३ आणि २५ वर्षाखालील संघाचा तो कर्णधार होता.
हे सुरु असताना एक दिवस तो कर्नाटकच्या रणजी संघाच्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये खेळायला गेला. तिथे त्याने भरपूर धावा काढल्या आणि काही कळायच्या आत तो कर्नाटकच्या रणजी संघात होता. कर्नाटकसाठी खेळताना त्याने पोत्याने धावा काढल्या. साहजिकच काही वर्षात त्याची भारतीय संघात निवड झाली. आपल्या पहिल्याच एकदिवसीय मालिकेत त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. तुम्ही विचार करत असाल कोण हा क्रिकेटपटू? तर तो आहे राघवेंद्रराव विजय भारद्वाज.
१९९९ च्या एल जी कपमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याअगोदर १९९९-२००० च्या रणजी करंडकात कर्नाटक संघाकडून त्याने १००० पेक्षा जास्त धावा करून भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने १० षटकांत फक्त १६ धावा देत १ बळी मिळवला होता. त्याच सामन्यामध्ये सुनिल जोशी या त्याच्या कर्नाटक संघातील सहकाऱ्याने १० षटकांत फक्त ६ धावा देत ५ बळी मिळवले होते.
त्याच्या या कामगिरीमुळे विजयची गोलंदाजी झाकोळली गेली. त्याच मालिकेतल्या इतर सामन्यांत चांगली गोलंदाजी करत त्याने १२ धावांच्या सरासरीने १० बळी मिळवले आणि संघाला वेळोवेळी उपयोगी पडतील अशा ८९ धावाही काढल्या. विजयला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. रातोरात विजय स्टार झाला. भारतीय क्रिकेटचा पुढचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यावेळी शाळेत असणाऱ्या आम्ही विजय भारद्वाज कसा भारी आहे याबाबत चर्चा केल्याचे आठवते.
एलजी कपमध्ये साकारलेल्या खेळीनेच कसोटी क्रिकेटचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली. आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय शून्यावर बाद झाला आणि गोलंदाजीमध्ये त्याने १ बळी मिळवला. पुढच्या सामन्यातही त्याला फार काही करता आले नाही.
आपल्या कसोटी कारकिर्दीतला शेवटचा कसोटी सामना त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची घसरगुंडी उडाली. लक्ष्मण एकटा सोडला तर बाकी कोणी भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. भारताचा पराभव झाला. विजयला तर फलंदाजी देखील करता आली नाही. कारण? ऐन वेळी त्याला मणक्याचा त्रास सुरु झाला होता. या दुखापतीमुळे विजय भारतीय संघातून बाहेर गेला तो नंतर कधी परत आलाच नाही. कसोटीप्रमाणेच विजयला एकदिवसीय सामन्यांमध्येही आपली चमक दाखवता आली नाही. अखेरीस १० एकदिवसीय सामने खेळून त्याला संघातून बाहेर बसावे लागले.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये मात्र विजयने भरपूर धावा काढल्या, बळी मिळवले पण भारतीय संघात त्याची पुन्हा निवड झाली नाही. काही जणांच्या मते विजयच्या निवड समिती बरोबरच्या मतभेदांमुळे त्याला कधीही संधी मिळाली नाही. तर काही जणांच्या मते सततच्या दुखापतींमुळे भारतीय संघात स्थान मिळवणे त्याला अवघड झाले.
कर्नाटककडून खेळलेल्या ९६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये विजयने १४ शतकांच्या मदतीने ५५५३ धावा काढल्या आणि ५९ बळीही मिळवले. २००४ सालापर्यंत कर्नाटक संघाकडून खेळणाऱ्या विजयने २००५ चा हंगाम झारखंडकडून खेळला. कर्नाटक संघामधून आपल्याला वगळल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला असे त्यानंतर त्याने सांगितले होते.
२००६ सालचा हंगाम कर्नाटककडून खेळण्याची इच्छा असलेल्या विजयचे नाव संभाव्य ३० खेळाडूंच्या यादीतही नव्हते. याचवेळी त्याच्या डोळ्यावर लेझर शस्त्रक्रिया झाली. ती शस्त्रक्रिया करताना डॉक्टरकडून काहीतरी चूक झाली आणि त्याचा परिणाम त्याच्या दृष्टीवर झाला. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना बऱ्याचदा त्याला चेंडू दिसत नसे. अखेरीस नोव्हेंबर २००६ मध्ये वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वयाच्या ३५-३७ वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू आजही आपल्याला दिसतात. असे असताना ३० व्या वर्षी दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीमुळे निवृत्ती घेणे त्याला किती जड गेले असेल याचा विचार न केलेला बरा.
विजय भारद्वाज चष्मा लावून खेळायचा. त्याचा चष्मासुद्धा वर्गातल्या स्कॉलर पोरांचे चष्मे असतात तसा होता. त्यावेळी तो शाळेत खरोखर स्कॉलर होता याची कल्पना नव्हती. आपल्या कारकिर्दीची सुरुवात जोरदार करणारा विजय इतक्या लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडेल असे त्यावेळी तरी निश्चित वाटले नव्हते.
निवृत्तीनंतर इतर बरेच खेळाडू जे करतात तेच त्याने केले. कर्नाटक संघासाठी तो प्रशिक्षक बनला. कर्नाटकशी त्याचे नाते इतके घट्ट होते की कर्नाटकच्या कोणत्याही क्रिकेट संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची त्याची तयारी होती. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही त्याने तीन वर्षे काम केले. एका कन्नड वाहिनीवर क्रिकेट विश्लेषक म्हणून त्याने काही दिवस काम केले.
प्रशिक्षक म्हणून काम करता करता विजयने स्पोर्टींगमाईंडस टेक्नॉलॉजी नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीने मिस्टर क्रिकेट नावाचे खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण करणारे एक सॉफ्टवेअर बनवले होते. मध्यंतरी एकदा त्याचा या कंपनीतला एके काळचा भागीदार आणि नंतर दक्षिण आफ्रिका संघाचा कामगिरी विश्लेषक बनलेला प्रसन्न रमण अगोराम याच्याबरोबर वाद झाला. आपल्या कंपनीने बनवलेल्या मिस्टर क्रिकेट या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड प्रसन्नाने चोरला असा आरोप विजयने केला होता. त्यावरून प्रसन्नाची बंगलोर पोलिसांनी चौकशीदेखील केली होती.
या केसचे पुढे काय झाले याची माहिती कुठेही समोर आली नाही. (इंटरनेटवर थोडी माहिती शोधली असता मिस्टर क्रिकेट हे सॉफ्टवेअर प्रसन्नाने बनवले होते असे कळले. प्रसन्नाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये सुवर्णपदक मिळवले होते यावरून त्याने हे सॉफ्टवेअर बनवले असेल यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. )
विजयने ओमान देशाच्या क्रिकेट संघासाठीही आपला जुना सहकारी सुनील जोशी (फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक) बरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
विजयची क्रिकेट कारकीर्द
एकदिवसीय
सामने-१० धावा -१३६ बळी -१६
कसोटी
सामने-३ धावा -२८ बळी -१
प्रथम श्रेणी
सामने-९६ धावा -५५५३ बळी -५९
वाचा –
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर
आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”