इंडियन प्रीमियर लीगमधील २०२१ (आयपीएल) ४९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्या दरम्यान खेळला गेला. केकेआरने या सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवत प्ले ऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. त्याचवेळी या सामन्यात खेळणारा हैदराबादचा प्रमुख वेगवान गोलंदाज व उपकर्णधार भुवनेश्वर कुमार याने एका खास विक्रमाची नोंद केली.
भुवनेश्वरच्या नावे खास विक्रम
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमार याने केकेआरविरुद्ध सामन्यात मैदानात प्रवेश करताच एका वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. सनरायझर्स हैदराबादसाठी १०० आयपीएल सामने खेळणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू बनला. भुवनेश्वर २०१४ पासून या संघाचा सदस्य आहे. त्याने काही काळ डेविड वॉर्नरच्या अनुपस्थित संघाचे नेतृत्व देखील केले होते.
अशी राहिली आहे आजवरची आयपीएल कामगिरी
आयपीएलच्या इतिहासातील अव्वल गोलंदाजांपैकी एक असलेला भुवनेश्वर कुमार आज पर्यंत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स इंडिया व सनरायझर्स हैदराबाद संघांचा सदस्य राहिला आहे. त्याने आजवर आयपीएलमध्ये १३१ सामने खेळताना १४१ बळी मिळवले आहेत. दरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी १९ धावा देत ५ बळी अशी राहिली आहे. त्याचा इकॉनॉमी रेटही केवळ ७.३० असा मामुली राहिला आहे. भुवनेश्वर हा एकमेव असा भारतीय गोलंदाज आहे ज्याने दोन वेळा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप आपल्या नावे केली होती.
केकेआरचा शानदार विजय
दुबई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. केकेआरच्या सर्व गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हैदराबादचा डाव ११५ धावांवर रोखला. त्यानंतर, हैदराबादने काही झटपट बळी मिळवत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुबमन गिलने ५७ धावांची लाजवाब खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.