सध्या जारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशचा सामना दिल्लीशी होत आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेशचा कर्णधार भुवनेश्वर कुमारनं मोठी कामगिरी केली.
वास्तविक, भुवनेश्वर कुमारनं टी20 क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा गाठला आहे. यासह तो टी20 क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. या सामन्यापूर्वी त्यानं 286 टी20 सामन्यात 299 विकेट घेतल्या होत्या. दिल्लीचा फलंदाज यश धुलला बाद करून भुवनेश्वरनं हा पल्ला गाठला.
लेगस्पिनर युझवेंद्र चहल टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे. चहलनं आतापर्यंत खेळलेल्या 305 सामन्यांमध्ये 23.75 च्या सरासरीनं 354 बळी घेतले आहेत. तो देखील या स्पर्धेत खेळतोय. भुवनेश्वर कुमारनं 2012 ते 2022 दरम्यान टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करताना 90 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे युजवेंद्र चहल (96) आणि अर्शदीप सिंग (94) आहेत.
चेंडू दोन्ही बाजूंना स्विंग करण्यात पटाईत असलेल्या भुवनेश्वर कुमारनं 2009 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चॅम्पियन्स लीग टी20 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून टी20 पदार्पण केलं होतं. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला चार षटकांत 31 धावा देऊन एकही बळी घेता आला नव्हता.
भुवनेश्वर कुमारनं आयपीएलच्या 176 सामन्यांमध्ये 181 विकेट घेतल्या आहेत. अशाप्रकारे तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज मानला जातो. आगामी आयपीएल 2025 पूर्वी सनरायझर्स हैदराबादनं भुवनेश्वर कुमारला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे तो मेगा लिलावात दिसणार आहे. भुवनेश्वरची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. आता लिलावात त्याच्यावर कोणती फ्रेंचायझी बोली लावते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 भारतीय गोलंदाज
(1) युझवेंद्र चहल – 354 (305 सामने)
(2) पियुष चावला – 315 (295 सामने)
(3) रविचंद्रन अश्विन – 310 (324 सामने)
(4) भुवनेश्वर कुमार – 300 (287 सामने)
(5) जसप्रीत बुमराह – 295 (233)
हेही वाचा –
राहुल-यशस्वीसमोर ‘किंग कोहली’ही नतमस्तक! मैदानावर येऊन ठोकला सॅल्यूट; VIDEO पाहा
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 10 विदेशी गोलंदाज, बुमराहनं मोडला वसीम अक्रमचा रेकॉर्ड!
यशस्वी जयस्वाल बनला कसोटी क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’, मॅक्युलमचा रेकॉर्ड उद्ध्वस्त!